Asia Cup 2025: आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) साठी पाकिस्तानने (Pakistan Team Aquad) आपल्या संघाची घोषणा केली आहे. संघ जाहीर होताच पाकिस्तानचे निवडकर्ता आकिब जावेद (Aaqib Javed) यांनी टीम इंडियाला (Team India) थेट आव्हान दिले आहे. आगामी आशिया कपमध्ये पाकिस्तानचा संघ ग्रुप-ए मध्ये भारतासोबत आहे. १४ सप्टेंबरला दुबईमध्ये या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्ये जोरदार सामना होणार आहे.
संघाच्या घोषणेनंतर आकिब जावेद यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल मोठे विधान केले. ते म्हणाले की, “पाकिस्तानचा टी-२० संघ भारताला हरवू शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच मोठा असतो. आम्ही जो १७ सदस्यीय संघ निवडला आहे, त्यात भारतीय संघाला हरवण्याची पूर्ण क्षमता आहे. आम्ही संघावर कोणताही दबाव आणू इच्छित नाही, पण मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे.”
आतापर्यंत आशिया कपच्या टी-२० फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने झाले आहेत. यापैकी भारताने २ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानला फक्त एका सामन्यात विजय मिळाला आहे.
आकिब जावेद यांनी आशिया कप २०२५ साठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संघातून वगळण्यामागचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, “आम्ही या दोन्ही खेळाडूंना पूर्णपणे दुर्लक्षित केलेले नाही, पण जो चांगला खेळेल त्यालाच संघात स्थान मिळेल. गेल्या काही काळापासून साहिबजादा फरहान, सॅम अयुब आणि फखर जमान यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.” ते पुढे म्हणाले, “बाबर आणि रिझवान यांना संघात परत येण्याची संधी आहे. जर त्यांनी चांगली कामगिरी केली तर ते पुन्हा टी-२० संघात परत येऊ शकतात.”
२०२५ च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानला भारत, ओमान आणि यूएईसह ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तान १२ सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध आपला मोहीम सुरू करेल, त्यानंतर त्यांना १४ सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध बहुप्रतिक्षित सामना खेळायचा आहे. तथापि, हा सामना होईल की नाही हे येणारा काळच सांगेल. खरं तर, पहलगाम हल्ल्यानंतर, भारत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकतो.
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी आणि सुफियान.