
स्पार्क, आवटे संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला
भुगांव येथील द पूना वेस्टर्न क्लब (पीडब्ल्युसी) येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रूद्र पाटीदार याने फटकावलेल्या ८९ धावांच्या मदतीने स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीने डीजेसीए ॲकॅडमीचा ११४ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीने २० षटकात २०८ धावांचे लक्ष्य उभे केले. रूद्र पाटीदार याने ४९ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांसह ८९ धावांची खेळी केली. याशिवाय मानव देसाई (४६ धावा) आणि श्रीराम सराफ (३३ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. याला उत्तर देताना डीजेसीए क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ९४ धावांवर मर्यादित राहीला. उत्कर्ष कोकारे याने २५ धावांची खेळी केली. स्पार्क संघाच्या यश गायकवाड आणि विवान कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
DSP Cup 2026: सार्थक पाटीलची अष्टपैलू कामगिरी; पुणे Cricket क्लबचा ‘या’ संघावर थरारक विजय
यश वीर याने फटकावलेल्या नाबाद ९५ धावांच्या जोरावर विराग आवटे क्रिकेट ॲकॅडमीने अजित वाडेकर ॲकॅडमीचा ८ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमीने १३३ धावा धावफलकावर लावल्या. स्वरा गाडे (४२ धावा) आणि स्वराज गोगावले (२९ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. हे लक्ष्य विराग आवटे क्रिकेट ॲकॅडमीने १३.१ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. यश वीर याने ४१ चेंडूत ९ चौकार आणि ९ षटकारांसह नाबाद ९५ धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
स्पर्धेचे उद्घाटन डीजेएसजीचे आणि स्पोर्ट्स व्हेंचरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू धीरज जाधव व उद्योजक शुभम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रवी जाधव, मनोज शिंदे, रमेश खोरे, राणे आणि महेंद्र खरात आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमुळे पुण्यातील युवा क्रिकेटला प्रोत्साहन मिळेल आणि १३ वर्षाखालील गुणवान खेळाडूंना स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव मिळेल. तसेच त्यांच्या कौशल्यांना वाव मिळून भविष्यातील गुणवंत खेळाडू घडतील, असे धीरज जाधव यांनी सांगितले.
या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले असून स्पर्धेचे सामने गटसाखळी पध्दतीने होणार आहे. यजमान डीजेएसजी क्रिकेट ॲकॅडमी, राजस्थान रॉयल्स् क्रिकेट ॲकॅडमी, विराग आवटे क्रिकेट ॲकॅडमी, स्पार्क क्रिकेट ॲकॅडमी, अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमी, लाईन-अप क्रिकेट ॲकॅडमी हे संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत.
सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी
स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ३ गडी बाद २०८ धावा. रूद्र पाटीदार ८९, मानव देसाई ४६, श्रीराम सराफ ३३, आर्यन शिंदे १-१३ वि.वि. डीजेसीए क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद ९४ धावा. उत्कर्ष कोकारे २५, अवांतर धावा ३३, यश गायकवाड २-२, विवान कुलकर्णी २-८. सामनावीरः रूद्र पाटीदार.
अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १३३ धावा. स्वरा गाडे ४२, स्वराज गोगावले २९, अन्वय चारथल १-९, रिशान नाईक १-१९ पराभूत वि. विराग आवटे क्रिकेट ॲकॅडमीः १३.१ षटकात २ गडी बाद १३४ धावा. यश वीर नाबाद ९५, मिशांत धरमानी नाबाद १२, स्वराज गोगावले १-४१. सामनावीरः यश वीर.