
Raksha Khadse यांनी घेतली ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोची भेट; अन् म्हणाल्या...
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी ब्राझीलचा महान फुटबॉलपटू आणि जागतिक विश्व चॅम्पियन रोनाल्डो नाझारियोची भेट घेतली. याबाबतची माहिती रक्षा खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये खडसे म्हणतात की, आर-9 आणि जिरो फेनोमेनो (द फेनोमेनन) या नावाने प्रसिद्ध ब्राझीलचे प्रसिद्ध स्ट्रायकर रोनाल्डो नाझारियो यांच्यासोबत एक अविस्मरणीय भेट. दोन वेळचे विश्वचषक विजेता आणि फुटबॉलच्या ऑल-टाइम ग्रेट खेळाडूंपैकी एक, त्यांचा हा सुंदर प्रवास येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिल.
त्या पुढे म्हणाल्या की, अशा प्रकारची चर्चा एक बळकट क्रीडा परिसंस्था (स्पोर्टिंग इकोसिस्टम) तयार करण्याचे महत्त्व अधिक अधोरेखित करते, जी तरुण भारतीय प्रतिभेला मोठी स्वप्ने पाहण्यास आणि सर्वोच्च पातळीवर स्पर्धा करण्यास सक्षम बनवते.
रोनाल्डो सध्या एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी भारत दौऱ्यावर आहे. या काळात रक्षा खडसे यांनी त्याची भेट घेतली. 18 सप्टेंबर 1976 साली रियो दि जिनेरियो, ब्राझीलमध्ये जन्मलेल्या रोनाल्डोला फक्त ब्राझीलच नाही, तर फुटबॉलच्या इतिहासात महान खेळाडूंपैकी एक समजले जाते.
स्ट्रायकरच्या रुपात खेळणारा रोनाल्डो 1994 आणि 2002 मधील विश्वचषक जिंकणाऱ्या ब्राझील संघाचा भाग होता. ब्राझीलला 2002 विश्वचषक जिंकून देण्यास रोनाल्डोने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो या विश्वचषकात सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू ठरला होता. रोनाल्डोने 7 सामन्यात 8 गोल केले होते. 1994 ते 2011 या कालावधीत ब्राझीलसाठी खेळलेल्या 98 सामन्यात रोनाल्डोने 62 गोल मारलेत.
रोनाल्डोने आपल्या क्लब करिअरमध्ये बार्सिलोना, इंटर मिलान, रिअल माद्रीद, एसी मिलानसारख्या मोठ्या क्लबकडून खेळण्याचा अनुभव घेतला आहे. 1993 पासून 2011 पर्यंत क्लब करिअरमध्ये खेळताना त्याने एकूण 384 सामन्यात 280 गोल केले आहेत.
रोनाल्डोला तीन वेळा फीफा वर्ल्ड प्लेअर ऑफ द इअर निवडण्यात आले आहे. त्याशिवाय त्याने दोन वेळा बॅलन डी ओर पुरस्कारही पटकावला आहे. ब्राझीलचा हा दिग्गज स्ट्रायकर भविष्यातील फुटबॉलपटूंसाठी नेहमीच आदर्श राहिला आहे.
Ans: केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ब्राझीलचा माजी दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो नाझारियो यांची भेट घेतली.
Ans: रोनाल्डो नाझारियो हा ‘आर-९’ (R9) आणि ‘द फेनॉमेनॉन’ या नावांनी प्रसिद्ध आहे.
Ans: त्याने १९९४ ते २०११ या कालावधीत ब्राझीलच्या राष्ट्रीय संघासाठी ९८ सामन्यांत ६२ गोल केले.