फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रणजी ट्रॉफी २०२४-२५ : आजपासून भारताची भारतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफीचा शुभारंभ सुरु होणार आहे. भारतीय संघामध्ये खेळाडूला खेळण्याची संधी मिळते. टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी ही स्पर्धा पहिली आणि मुख्य पायरी मानली जाते. बीसीसीआयही रणजी ट्रॉफीला खूप महत्त्व देते. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना गेल्या वर्षी या स्पर्धेकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. यावेळी रणजी करंडक बदललेल्या नव्या शैलीत पाहायला मिळणार आहे. सहसा रणजी करंडक स्पर्धा प्रत्येक हंगामात एकाच टप्प्यात आयोजित केली जाते. मात्र यावेळी वेगळ्या पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे. यावेळी रणजी करंडक दोन टप्प्यात आयोजित करण्यात येणार आहे.
रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या या स्पर्धेमध्ये पहिला टप्पा आजपासून म्हणजेच ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यानंतर ती मध्यंतरी थांबवली जाईल आणि T२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, एकदिवसीय स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी आयोजित केली जाणार आहे. यानंतर रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा सुरू होईल. यामागे अनेक कारणे आहेत. याचे एक कारण म्हणजे उत्तर भारतातील हवामान. खेळाडूंवरील वर्कलोड मॅनेजमेंट हेही यामागे मोठे कारण आहे. वेगवान गोलंदाजांचा फिटनेस सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघ पाच साखळी सामने खेळणार आहे. हा टप्पा पाच आठवडे चालेल जो आजपासून सुरू होईल आणि या टप्प्यातील शेवटचा लीग सामना १३ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे करंडक स्पर्धा होणार आहे. त्यानंतर २३ जानेवारीपासून दुसरा टप्पा सुरू होईल. हा टप्पा सातत्याने सुरू राहणार असून २६ फेब्रुवारीपासून अंतिम सामना खेळवला जाणार आहे.