युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! (Photo Credit- X)
Yuzvendra Chahal: भारतीय संघासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजावणारा लेग-स्पिनर युझवेंद्र चहल पुनरागमनासाठी अथक परिश्रम घेत आहे. चहलने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा खेळण्याचे आश्वासन देत आहे. चहलने २०२६ च्या काउंटी चॅम्पियनशिप हंगामासाठी नॉर्थम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबशी करार केला आहे.
युझवेंद्र चहल गेल्या दोन वर्षांपासून नॉर्थम्प्टनशायरकडून खेळत आहे. नॉर्थम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये सलग तिसऱ्या हंगामासाठी करारबद्ध झाल्याची घोषणा केली. चहलने यापूर्वी गेल्या दोन काउंटी चॅम्पियनशिप हंगामात नॉर्थम्प्टनशायरकडून ३१ बळी घेतले होते.
तिसऱ्या हंगामासाठी चहलला करारबद्ध केल्याची घोषणा करताना नॉर्थम्प्टनशायरने म्हटले आहे की, सात वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी २१७ बळी घेतलेल्या भारतीय फिरकी गोलंदाजाची निवड केल्याने आगामी हंगामात त्यांच्या संघाला मोठा फायदा होईल.
यजुवेंद्र चहलने सलग तिसऱ्या हंगामात नॉर्थम्प्टनशायरसाठी करार केल्यानंतर आनंद व्यक्त करताना म्हटले की, “नॉर्थम्प्टनशायरकडून पुन्हा एकदा खेळताना मला आनंद होत आहे. ते माझे दुसरे घर बनले आहे आणि मला येथे खेळण्याचा खरोखर आनंद आहे.” चहलने ऑगस्ट २०२३ मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आणि अद्याप तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकलेला नाही. चहलने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९६ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १२१ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चहलचा चेंडूसह विक्रम पाहिला तर त्याने ४४ सामन्यांमध्ये ३४.९४ च्या सरासरीने १२७ विकेट्स घेतल्या आहेत.