RR vs KKR: Andre Russell records Bhim Parakram! Enters special list along with Gautam Gambhir and Uthappa..
RR vs KKR : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ५३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत आंद्रे रसेलच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानसमोर २०६ धावांचा डोंगर उभारला. कोलकाताने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी राजस्थान संघ मैदानात उतरला खरा पण, त्यांना केवळ २०५ धावाच करता आल्या आणि परिणामी १ रन्सने पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध वेगवान खेळी करत एक खास कामगिरी केली आहे. या सामन्यात रसेलने फक्त २५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५७ धावा चोपल्या. या खेळीसह त्याने ईडन गार्डन्स मैदानावर आपल्या १००० धावा पूर्ण केल्या आहेत. रसेल आता ईडन गार्डन्सवर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनला असून त्याने त्याच्या ५० व्या आयपीएल सामन्यात ही कामगिरी करून दाखवली आहे. जे या ऐतिहासिक मैदानावर खेळले गेले. डावाच्या १७ व्या षटकात जोफ्रा आर्चरला षटकार खेचून रसेलने २२ धावांचा टप्पा गाठला आणि १००० धावा पूर्ण केल्या.
या कामगिरिसह रसेल केकेआरचा माजी कर्णधार गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज रॉबिन उथप्पा यांच्यासह एका खास यादीत सामील झाला आहे. गंभीरने ईडन गार्डन्सवर सर्वाधिक १४०७ धावा केल्या आहेत. रॉबिन उथप्पाने या मैदानावर ११५९ धावा केल्या असून आंद्रे रसेलच्या या खेळीनंतर त्याने या मैदानावर १०३५ धावा पूर्ण केल्या आहेत.
आंद्रे रसेलने अजून एक खास कामगिरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे. रसेलने कोलकाताकडून २५५५ धावा केल्या आहेत. या यादीत कोलकात्यासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून गौतम गंभीर आघाडीवर आहे. ज्याने केकेआरकडून खेळताना ३०३५ धावा केल्या आहेत. यानंतर रॉबिन उथप्पा तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
केकेआरकडून आंद्रे रसेलने आतापर्यंत १३१ सामने खेळले आहेत. या काळात त्याने २५५५ धावा केल्या आहेत. त्याचा फलंदाजीचा स्ट्राईक रेट १७५.०० राहील आहे. त्याने आतापर्यंत १२ अर्धशतके झळकावली आहेत.