महान टेनिसपटू सेरेना विल्यम्सला यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवासह सेरेनाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला असून हा सामना सेरेनाच्या कारकिर्दीतील शेवटचा मानला जात आहे. या सामन्यात सेरेनाचा अजला टॉमलजानोविकने ७-५, ६-७, ६-१ असा पराभव केला.
सेरेना विल्यम्सने काही दिवसांपूर्वी तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टवरून आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केले होते. त्यानंतर यूएस ओपन ही टेनिस स्पर्धा तिच्या कारकिर्दीसाठी अखेरची ठरेल अश्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीत अजला टॉमलजानोविकचे आव्हान सेरेना समोर होते. पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने दुसऱ्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले, मात्र तिसऱ्या सेटमध्ये अजलाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत हा सेट सहज जिंकत सामना आपल्याकडे खेचून घेतला.
मागील जवळपास दीड वर्ष सेरेनासाठी टेनिस कोर्टवर पूर्ण फ्लॉप राहिला होता. माजी नंबर-१ खेळाडू सेरेनाला गेल्या ४५० दिवसांत केवळ एकच सामना जिंकता आला. यूएस ओपन मधील तिसऱ्या फेरीतील पराभवानंतर सेरेनाने चाहत्यांना ज्या पद्धतीने धन्यवाद दिले त्यानुसार तिची निवृत्ती निश्चित मानली जात आहे. सेरेना म्हणाली, अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या तुम्हा सर्वांचे मी येथे आभार मानू इच्छितो. हे सर्व माझ्या पालकांपासून सुरू झाले. मी त्यांचा आभारी आहे. मला माहित नाही, कदाचित हे आनंदाचे अश्रू आहेत. धन्यवाद बाबा, मला माहित आहे की तुम्ही बघतच असाल. धन्यवाद मम्मी.
सेरेना विल्यम्सची सुवर्ण कारकीर्द :
सेरेना विल्यम्सची गणना टेनिस जगतातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने आपल्या कारकिर्दीत २३ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. सेरेनाने १९९५ मध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. गेली २७ वर्षे ती सतत टेनिस खेळत आहे. ओपन एरामध्ये महिला आणि पुरुषांमध्ये सर्वाधिक एकेरी ग्रँडस्लॅम जिंकणारी ती टेनिसपटू ठरली आहे.