
photo - social media
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना श्रेयस अय्यरसाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करताना, अय्यरला एकही धाव काढता आली नाही. तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. यामुळे एकदिवसीय कर्णधारपदाच्या पदार्पणात हा एक नकोसा विक्रम अय्यरच्या नावावर नोंदवला गेला. एकदिवसीय कर्णधारपदाच्या पदार्पणात शून्यावर बाद होणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला.
यापूर्वी, भारतीय कर्णधाराने त्याच्या एकदिवसीय पदार्पणात केलेली सर्वात कमी वैयक्तिक धावसंख्या २ धावा होती. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही त्यांच्या कर्णधारपदाच्या पदार्पणात प्रत्येकी २ धावांवर बाद झाले होते. आता, श्रेयस गोल्डन डकवर बाद झाला असून, भारतीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाच्या पदार्पणात शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम त्याने प्रस्थापित केला आहे.
माउंट माउंगानुई येथील बे ओव्हलवर खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ३३४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. मॅट हेन्रीने पहिल्याच षटकात तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेत भारतीय फलंदाजीची फळी उद्ध्वस्त केली. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर विराट कोहली शून्यावर बाद झाला.
एवढेच नाही तर, हेन्रीने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार श्रेयस अय्यरलाही बाद केले. अशाप्रकारे, भारताने तीन महत्त्वाचे फलंदाज हिल्याच षटकात एकही धाव न काढता तंबूत परतले. यानंतर टीम इंडिया सामन्यात कमबॅक करु शकली नाही आणि संपूर्ण संघ ८९ धावांवर गारद झाला. हेन्रीने सामन्यात एकूण सहा विकेट्स घेत न्यूझीलंडला २४४ धावांनी विजय मिळवून दिला.