Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत एक नवीन अध्याय सुरू केला आहे. आगामी SA20 लीगमध्ये ते प्रिटोरिया कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. एखाद्या व्यावसायिक क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून गांगुली यांचा हा पहिलाच अनुभव असेल. संघाने रविवारी सोशल मीडियाद्वारे या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
सौरव गांगुली यांची नियुक्ती इंग्लंडचे माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट यांच्या राजीनाम्यानंतर झाली आहे. प्रिटोरिया कॅपिटल्सने शनिवारी ट्रॉट यांना त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले होते आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ SA20 लीगमध्ये कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
🚨 BREAKING 🚨
Sourav Ganguly has been appointed as the Head Coach of Pretoria Capitals in SA20. 🏆#Cricket #SA20 #Ganguly #SouthAfrica pic.twitter.com/rgOqzJIht0
— Sportskeeda (@Sportskeeda) August 24, 2025
सौरव गांगुली यांचे कॅपिटल्स फ्रँचायझीसोबत जुने नाते आहे. २०१२ मध्ये सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, त्यांनी विविध प्रशासकीय आणि सल्लागार पदांवर काम केले. २०१५ ते २०१९ या काळात ते बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) चे अध्यक्ष होते.
२०१९ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष बनण्यापूर्वी ते दिल्ली कॅपिटल्स (IPL) संघाचे सल्लागार होते. २०२३ मध्ये त्यांनी संघ संचालक म्हणून कॅपिटल्समध्ये पुन्हा प्रवेश केला. ऑक्टोबर २०२४ मध्ये, त्यांना JSW स्पोर्ट्सचे क्रिकेट प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्यांच्याकडे महिला फ्रँचायझी आणि प्रिटोरिया कॅपिटल्सची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
SA20 लीगच्या पहिल्या हंगामात प्रिटोरिया संघ उपविजेता होता, तर गेल्या वर्षी ६ संघांमध्ये पाचव्या स्थानावर होता. त्यामुळे आता गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या कामगिरीत सुधारणा होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दादांची आकडेवारी उत्कृष्ट
सौरव गांगुलीने ११३ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून, यात त्याने ४२.१७ च्या सरासरीने ७२१२ धावा केल्या आहेत. तसेच, ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१.०२ च्या सरासरीने ११३६७ धावा केल्या आहेत. कसोटीत १६ शतके आणि एकदिवसीय सामन्यात २२ शतके त्याच्या नावावर आहेत.