स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर फुटबॉलपासून ते आंतरराष्ट्रीय फुटबॉलपर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आता रोनाल्डोने फुटबॉलमध्ये ७०० गोल पूर्ण करत एक नवा विक्रम केला आहे. रविवारी पार पडलेल्या इंग्लिश प्रिमियर लीग (English Premier League) स्पर्धेत रात्री झालेल्या मँचेस्टर युनायटेड विरुद्ध एवरटन सामन्यात विजयी गोल करत रोनाल्डोने क्लब फुटबॉलमध्ये ७०० गोल पूर्ण केले आहेत.
रोनाल्डो हा ३७ वर्षाचा असून त्याने २० वर्षांपूर्वी स्पोर्टिंग लिस्बन क्लबकडून क्लब फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली. या २० वर्षांत त्याने स्पोर्टिंग लिस्बनसोबत मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रीद, युव्हेंटस अशा वेगवेगळ्या क्लबकडून खेळत तब्बल ९४४ सामन्यांत ७०० गोल पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
रोनाल्डोने पोर्तुगालचा फुटबॉल क्लब स्पोर्टिंग लिस्बनसाठी ५ गोल केले असून तो जास्तकाळ या संघाकडून खेळला नाही. एका सीजननंतरच तो मँचेस्टर युनायटेडमध्ये गेला. त्याने मँचेस्टर युनायटेडमधून खेळताना एकून १४४ गोल केले. त्यानंतर तो स्पेनचा प्रसिद्ध क्लब रिअल माद्रीदमध्ये सामिल झाला. या संघासाठी त्याने तब्बल ४५० गोल केले, यावेळी माद्रीदसाठी सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याने केला. त्यानंतर इटालियन क्लब युव्हेंटससाठी रोनाल्डो खेळू लागला, यावेळी त्याने १०१ गोल केले आणि पुन्हा तो मँचेस्टर युनायटेड संघात परतला आहे.
रोनाल्डो हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू देखील आहे. त्याने पोर्तुगालसाठी १८९ सामन्यात ११७ गोल केले आहेत. अलीकडेच बोलताना रोनाल्डो म्हणाला,”सध्यातरी फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही आणि युरो २०२४ पर्यंत त्याला आपल्या देशासाठी खेळायचे आहे.”