संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे, धमक्या यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून झालेली ओळख एका मिठाई विक्रेत्याला चांगलीच महागात पडली. महिलेने मिठाई विक्रेत्याला धमकावून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय विक्रेत्याने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार स्नेहा मोहित कदम (वय ३०, रा. सांगली) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे लक्ष्मी रस्त्यावर मिठाई विक्रीचे दुकान आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून विक्रेत्याची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. नंतर आरोपी महिलेने त्यांना जाळ्यात ओढले. २५ सप्टेंबर रोजी महिला लक्ष्मी रस्त्यावर मिठाई विक्री दुकानात आली. मिठाई विक्रेत्याची कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी देऊन दुकानाच्या गल्ल्यातील ५०० रुपये आणि मिठाईचे खोके घेऊन गेली. त्यानंतर महिला पुन्हा मिठाई विक्रेत्याला भेटण्यास आली. कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन ७० हजार रुपये घेतले.
७० हजार रुपये घेतल्यानंतर आरोपी महिलेने पुन्हा धमकावून हे प्रकरण मिटविण्यास २ लाख रुपये मागितले. तेव्हा मिठाई विक्रेत्याने तिला दुकानात बोलाविले. दुकानात दोन लाख रुपये देतो, असे सांगितले. तेव्हा तिने दुकानात येण्यास नकार दिला. ऑनलाइन पद्धतीने २ लाख रुपये पाठविण्यास सांगितले. मिठाई विक्रेत्याने आरोपी महिलेच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने २५ हजार रुपये पाठविले. महिलेच्या धमकीमुळे घाबरलेल्या मिठाई विक्रेत्याने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली. सहायक निरीक्षक शीतल जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद
रांजणगाव एमआयडीसी परिसरात किरकोळ वादातून घरात घुसून हल्ला करत तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या दोघांना केवळ दोन तासात अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ओंकार सिताराम वाळके आणि विजय ज्ञानेश्वर जगधने (दोघेही रा. कोरेगाव, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे.