
Sunrisers Leeds: काव्या मारनची टीमचा कमालीचा खेळ (फोटो सौजन्य - X.com)
काव्या मारनच्या मालकीच्या Sunrisers Leeds साठी, डावाची सुरुवात करणाऱ्या रिकेल्टनने ४२ चेंडूंमध्ये ९४ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ८ षटकार आणि ७ चौकारही मारले. रिकेल्टन व्यतिरिक्त, मिचेल मार्श आणि हॅरी ब्रूक यांनीही सनरायझर्ससाठी उत्कृष्ट फलंदाजी केली. मार्शने ३७ चेंडूंमध्ये ७ षटकार आणि ६ चौकारांसह ७६ धावा ठोकल्या, तर ब्रूकने केवळ १८ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ५ षटकारांसह ५५ धावा केल्या.
लंडननेही सनरायझर्सला कडवी झुंज दिली
सनरायझर्सविरुद्ध २४२ धावांचे लक्ष्य गाठताना लंडनने जोरदार झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघाची सुरुवात फारशी प्रभावी ठरली नाही. सलामीवीर जॉनी बेअरस्टो एकही धाव न काढता बाद झाला. त्यानंतर लुहान-ड्रे प्रिटोरियस केवळ ५ धावा करून बाद झाला. सलग दोन विकेट पडल्याने लंडनची परिस्थिती आणखी बिकट झाली, पण लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी काही काळासाठी डाव सावरला. लंडनने धावगती वाढवायला सुरुवात केलीच होती, तेवढ्यात ४४ धावांवर लिव्हिंगस्टोन आणि त्यानंतर जेम्स कोल्स बाद झाले.
लंडनने काही वेळातच ५६ धावांत पाच विकेट गमावल्या, पण त्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड विलीने वादळ निर्माण केले. निर्भयपणे फलंदाजी करत त्याने ४६ चेंडूंमध्ये ८३ धावा ठोकल्या. जेमी ओव्हरटनने डेव्हिड विलीसोबत २७ धावा करून संघाला २०० धावांच्या पुढे नेले. मधल्या फळीत, डेवाल्ड ब्रेविसने ३८ आणि लिव्हिंगस्टोनने ३४ धावा केल्या, पण असे असूनही लंडनला लक्ष्य गाठता आले नाही.
द हंड्रेड क्रिकेट लीग काय आहे?
‘द हंड्रेड’ ही युनायटेड किंगडममधील एक व्यावसायिक १००-चेंडूंची क्रिकेट लीग आहे. याचे आयोजन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) द्वारे केले जाते. ही जगातील एकमेव क्रिकेट स्पर्धा आहे जिथे पारंपरिक षटकांऐवजी प्रत्येक डावात १०० चेंडू टाकले जातात. याचे मुख्य नियम आणि स्वरूप जर समजून घ्यायचे झाले तर हा १००-चेंडूंचा खेळ आहे. म्हणजेच प्रत्येक डावात १०० वैध चेंडू असतात.
यामध्ये एक गोलंदाज सलग ५ किंवा १० चेंडू टाकू शकतो आणि एका टोकाकडून १० चेंडू टाकल्यानंतर बाजू बदलली जाते. तर एक गोलंदाज एका डावात जास्तीत जास्त २० चेंडू टाकू शकतो. पुरुष आणि महिला दोन्ही संघ ८ शहर-आधारित फ्रँचायझी संघांमध्ये खेळतात.