
Syed Mushtaq Ali Trophy : पदार्पणाच्या सामन्यात जमशेद आलमचा कहर! सलग 4 चेंडूंवर 4 विकेट्स घेत रचला इतिहास
Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रेल्वेकडून खेळणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मध्यमगती वेगवान गोलंदाज जमशेद आलमने पदार्पणाच्या सामन्यातच ऐतिहासिक कामगिरी केली. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 4 चेंडूंवर 4 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, पुढील षटकात आणखी एक विकेट घेत त्याने अवघ्या नऊ चेंडूंमध्ये 5 विकेट्स पूर्ण केले.
जमशेद आलम सलग 4 चेंडूंवर 4 विकेट्स घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 5 विकेट्स घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज बनला आहे.
सौराष्ट्रच्या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी जमशेद मैदानात आला. आपल्या पहिल्याच षटकात त्याने हार्विक देसाई, प्रेरक मांकड, रुचित अहीर आणि समर गज्जर यांना सलग 4 चेंडूंवर बाद केले. त्यानंतर पुढील षटकात सिद्धार्थ राणाला माघारी धाडत त्याने 5 विकेट्सचा टप्पा गाठला.
जमशेदने या सामन्यात 38 धावा देत 5 विकेट्स मिळवल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे सौराष्ट्रची अवस्था एकवेळ 6 बाद 30 अशी झाली होती.
जमशेदच्या आधी भारताच्या दोन गोलंदाजांनी पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये सलग 4 चेंडूंवर 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने नोव्हेंबर 2019 मध्ये हरियाणाविरुद्ध, तर विदर्भाच्या दर्शन नळकांडेने नोव्हेंबर 2021 मध्ये कर्नाटकविरुद्ध हा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे, या दोघांनीही डावाच्या 20व्या षटकात ही कामगिरी केली होती.
पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये जमशेदपेक्षा कमी चेंडूंमध्ये 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम भारताबाहेरील केवळ दोन गोलंदाजांनी केला आहे. इंडोनेशियाच्या गेडे प्रियंदनाने कंबोडियाविरुद्ध 6 चेंडूंमध्ये, तर फिनलंडच्या महेश तांबेने एस्टोनियाविरुद्ध 8 चेंडूंमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. या दोन्ही कामगिरी 2025 मध्ये झाल्या होत्या.
दरम्यान, या सामन्यात रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या मोबदल्यात 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात सौराष्ट्रचा संघ आठ विकेट्स गमावून 153 धावाच करू शकला. त्यामुळे रेल्वेने हा सामना 29 धावांनी जिंकला.
Ans: जमशेद आलमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेत रेल्वेकडून खेळताना ही कामगिरी केली.
Ans: त्याने सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेतल्या.
Ans: त्याने अवघ्या नऊ चेंडूंमध्ये पाच विकेट्स पूर्ण केल्या.