हार्दिकच्या नव्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता यजमान आयर्लंडविरुद्ध मालिका आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. भारताला आपले वर्चस्व अबाधित ठेवत आयर्लंडविरुद्ध सलग सातव्या विजयाची संधी आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे.
डबलिनच्या द व्हिलेज मलाहिदे मैदानावरील सलामी सामन्यात रात्री ९ वाजेपासून हे दोन्ही संघ समोरासमोर असतील. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. या ठिकाणी शनिवारी हलक्या सरी पडल्या. यंदा १५ व्या सत्रातील आयपीएल चॅम्पियन गुजरात संघाच्या हार्दिककडे या मालिकेसाठी टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. तो आता भारताचा टी-२० फॉरमॅटमधील नववा कर्णधार म्हणून मैदानावर उतरणार आहे.
[read_also content=”एकनाथ शिंदे गटाची सुप्रीम कर्टात याचिका; शिंदे गट विरुद्ध शिवसेना ‘सामना’ रंगणार? https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-groups-petition-in-supreme-court-shiv-sena-to-play-match-against-shinde-group-nrdm-297431.html”]
भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत वनडे आणि टी-२० चे एकूण सहा सामने झाले आहेत. यातील सर्वच सामन्यांत टीम इंडियाला मोठ्या दिमाखात विजयी पताका फडकवता आली. यातील टी-२० फॉरमॅटच्या तिन्ही सामन्यांत भारताला विजयाची नोंद करता आली. त्यामुळे भारताला आपले निर्विवाद वर्चस्व या मालिकेतही सिद्ध करण्याची संधी आहे. दुसरीकडे यजमान संघाला घरच्या मैदानावर मोठी कसरत करावी लागेल.






