
IND Vs ENG : शतक हुकलं तरी 'रूट'ने दाखवला रुबाब ! 'टीम इंडिया'चा 4 विकेट्सने पराभव
कार्डिफ : कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाने भारतीय संघाचा 4 गडी राखून पराभव केला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांनंतरही, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 44 षटकांत केवळ 233 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात, जो रूटच्या नाबाद 99 धावांच्या जोरावर इंग्लंडने सहज विजय मिळवला.
इंग्लंडने 44.1 षटकांत 6 गडी गमावून 235 धावा करत सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. रूटला शतक पूर्ण करण्यासाठी फक्त एका धावेची गरज होती, पण त्याने ॲटकिन्सनला सामना संपवण्याची संधी दिली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांनंतरही, गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ 44 षटकांत 233 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने शानदार गोलंदाजी करत 47 धावांत तीन बळी घेतले.
तर, गस ऍटकिन्सननेही तीन बळी घेतले आणि साकिब महमूदने दोन बळी घेतले. सॅम करन आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. प्रत्युत्तरात, इंग्लंडने पहिल्याच चेंडूवर बेन डकेटला गमावले, जो जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने जेकब बेथेलला बाद केले. कर्णधार हॅरी ब्रुक 16 चेंडूंमध्ये केवळ 16 धावाच करू शकला. जोस बटलर 18 चेंडूंमध्ये 17 धावा करून बाद झाला. विल जॅक्सने 44 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या आणि तो गुरनूर ब्रारच्या गोलंदाजीवर बाद झाला. जो रूट 133 चेंडूंमध्ये नऊ चौकारांसह नाबाद 99 धावांवर परतला.
शुभमन गिल 31 धावा करून बाद
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला आठव्या षटकात पहिला धक्का बसला. कर्णधार शुभमन गिल ऍटकिन्सनच्या गोलंदाजीवर 30 चेंडूंमध्ये 31 धावा करून बाद झाला. सलामीवीर रोहित शर्मा 47 चेंडूंमध्ये केवळ 26 धावाच करू शकला. इशान किशन सॅम करनच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्टार फलंदाज विराट कोहलीने 66 चेंडूंमध्ये 65 धावा केल्या आणि रोहित व श्रेयससोबत अर्धशतकी भागीदारी केली. सुंदरला पाच चेंडूंमध्ये केवळ दोन धावा करता आल्या.
केएल राहुलच्या जागी इशान किशन
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी कार्डिफमध्ये खेळला गेला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी संघात बदल केले. इंग्लंडने जोश टंग आणि लियाम डॉसन यांच्या जागी साकिब महमूद आणि गस ऍटकिन्सन यांना संघात स्थान दिले. भारताने केएल राहुलच्या जागी इशान किशनला संघात घेतले.