
भारताचा स्टार क्रिकेटपटू असलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) दमदार खेळीचे चाहते जगभरात आहेत. विराटने आपल्या खेळीने आजवर अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. मात्र क्रिकेटचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीला दोन वर्षांपूर्वी भारतीय संघाबाहेर काढण्याची मागणी काही दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी केली होती. २०१९ च्या अखेरीस विराटने बांगलादेशविरुद्ध एक शतक ठोकलं आणि त्यानंतर विराटचा दमदार फॉर्म हळूहळू कमी होऊ लागला.
बघता बघता दोन वर्षे उलटली तब्बल ७० शतकं ठोकणारा विराट एका शतकासाठी देखील तरसू लागला. याकाळात त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद देखील सोडले. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असे देखील अनेकांनी सुचवले. मात्र दोन वर्ष वाईट फॉर्मशी झगडणाऱ्या विराटला अखेर आशिया कप २०२२ मध्ये सूर गवसला. अफगाणिस्ताविरुद्ध विराटने शतक ठोकून किंग कोहली पुन्हा फॉर्मात परतला.
सध्या ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी भारतासाठी अत्यंत महत्वाची ठरली आहे. आतापर्यंत भारतानं खेळलेल्या 4 सामन्यांतील तीन सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं असून दोन सामन्यात सामनावीर म्हणून त्याला गौरवण्यातही आलं आहे. तर केवळ दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामन्यात विराट स्वस्तात बाद झाला आहे.
टी २० विश्वचषकात पाकिस्तान विरुद्धचा चुरशीच्या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा मॅच विनर ठरला. भारताला पाकिस्तान विरुद्ध विजयासाठी १६० धावा करायच्या असताना, भारताने ३१ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. अशावेळी कोहली आणि हार्दिक पंड्याने शानदार भागिदारी करत भारताचा विजय पक्का केला. विराटने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या होत्या. त्यानंतर नेदरलँडविरुद्धही विराटनं नाबाद 62 धावा केल्या. तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही विराटनं फलंदाजीची धुरा सांभाळत नाबाद ६४ धावांची खेळी केली. त्यामुळे विराटने त्याच्यावर टीका करणाऱ्या आणि कधीकाळी त्याला निवृत्ती आणि संघाबाहेर काढायला सांगणाऱ्यांना त्याच्या खेळीने सडेतोड उत्तर दिले आहे.