
Virat Kohli On Winning ODI World Cup 2027:
विराट कोहलीने जिओ हॉटस्टारवरील एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक हा भारतासाठी त्याचा शेवटचा असेल आणि काहीही झाले तरी तो जिंकणे हे त्याचे ध्येय आहे. कसोटी आणि टी-२० मधून निवृत्त झाल्यापासून त्याच्या खेळात झालेल्या बदलांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला, ‘मी केलेला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे मी स्वतःला अधिक मोकळेपणाने खेळण्याचे वचन दिले आहे. मी लोकांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांची चिंता करणार नाही. गेल्या काही काळापासून, परिस्थिती स्थिर ठेवणे हीच माझी भूमिका राहिली आहे. पण, मला माहित आहे की मी चांगली कामगिरी करू शकतो. मला माहित आहे की मी शॉट्स मारू शकतो, पण जेव्हा परिस्थिती तुमच्या बाजूने नसते आणि तुम्ही कठीण खेळपट्टीवर खेळत असता, तेव्हा तुम्हाला अशा परिस्थितीत वाटते की, मी फटके मारू शकतो, पण मला एक विशिष्ट भूमिका निभवावी लागेल.’
कोहलीने पुढे टीम इंडियाच्या युवा खेळाडूंबाबत आणि कर्णधार शुभमन गिलबाबतही भाष्य केले. कोहलीने हेही निश्चित केले की तो २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी उपलब्ध असेल. तो म्हणाला की, ‘माझा हा भारतासाठीचा शेवटचा विश्वचषक आहे. हीच माझी प्रेरणा आहे. मला मैदानावर माझे सर्वस्व द्यायचे आहे. मला कोणत्याही परिस्थितीत विश्वचषक जिंकायचा आहे आणि हेच माझे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी जे काही लागेल ते मी करेन.’ हा कोहलीचा पाचवा एकदिवसीय विश्वचषक असेल. त्याने आपल्या कारकिर्दीत दोन विश्वचषक अंतिम सामने खेळले आहेत.
शुभमन गिल एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे. गिलच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, ‘गिल अजूनही या गोष्टी शिकत आहे. सध्या तो या कर्णधाराची भूमिका त्याच्यासाठी नवीन आहे पण टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी त्याच्याकडे योग्य वृत्ती आहे. मैदानावर त्याच्या योजना अगदी स्पष्ट असतात. मैदानावर संघाच्या रणनीतीबद्दल गिलची मते स्पष्ट आहेत. प्रत्येक कर्णधाराप्रमाणेच, वेळेसोबत अधिक अनुभव आणि परिस्थितीची जास्त समज आल्यावर तो यामध्ये सुधारणा करत राहील. माझा विश्वास आहे की तो दीर्घकाळ कर्णधारपद भूषवेल आणि खूप चांगली कामगिरी करेल.’