Sawan Barwal wins silver medal in Asian Games
सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने सुरुवातीला आघाडी घेतली आणि अर्ध्या अंतरापर्यंत तो दुसऱ्या स्थानावर घसरला. त्यानंतर त्याने २१ किलोमीटरवर पुन्हा आघाडी घेतली, पण अखेरीस तो मागे पडू लागला. बरवालने शेवटच्या काही किलोमीटरमध्ये दमदार कमबॅक करत अनेक खेळाडूंना मागे टाकले आणि २:११:३७ वेळेत शर्यत पूर्ण केली. यासह त्याने रौप्य पदक पटकावले. जपानच्या इचिताका यामाशिता सावनपेक्षा ४८ सेकंद आधी पोहोचला. त्याने २:१०:४९ वेळेत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. चीनच्या पेयू फेंगने २:१२:१३ वेळेत शर्यत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले.
A personal best on the biggest stage 🇮🇳🥈 Sawan Barwal clocks 2:11:37 to win silver medal in the men’s marathon at #AichiNagoya2026. 🤌 pic.twitter.com/RF3gkslYKd — Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 26, 2026
भारताची ४४ वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. यापूर्वी, १९८२ मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत होसूर कुक्कप्पा सितारनने भारतासाठी मॅरेथॉनमध्ये कांस्य पदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉन पदक जिंकणारा बरवाल हा चौथा भारतीय ठरला आहे. यापूर्वी, १९५१ मध्ये दिल्लीत झालेल्या पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत छोटा सिंगने सुवर्णपदक आणि सुरत सिंग माथूरने कांस्यपदक जिंकले होते. ५००० मीटर, १०००० मीटर आणि हाफ मॅरेथॉन धावल्यानंतर बरवालने यावर्षी मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले. एप्रिलमध्ये, बरवालने रॉटरडॅम येथील एनएन मॅरेथॉनमध्ये शिवनाथ सिंग यांचा ४८ वर्षे जुना २:११:५८ वेळेचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता.
सावन बरवाल हा २८ वर्षीय लांब पल्ल्याचा धावपटू आहे. तो हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील जोगिंदर नगरचा रहिवासी आहे. तो भारतीय सैन्यात हवालदार आहे. पूर्ण मॅरेथॉनमध्ये येण्यापूर्वी, बरवालने शॉर्ट ट्रॅक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. एप्रिल २०२६ मध्ये, त्याने पदार्पणातच रॉटरडॅम मॅरेथॉन २:११:५८ वेळेत पूर्ण करून विक्रम मोडले. त्याने आपल्या पहिल्याच मॅरेथॉन स्पर्धेत शिवनाथ सिंग यांचा ४८ वर्षे जुना विक्रम मोडला. २०२४ मध्ये, त्याने ५००० मीटरचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आणि २०२५ च्या राष्ट्रीय खेळांमध्ये ५००० मीटर व १०००० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. परंतु, त्याने आता आशियाई खेळांमध्ये आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले आहे.






