फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारतीय हॉकी संघाचा नवा गोलकिपर कोण : भारताच्या हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक नावावर केले. त्यानंतर भारतीय हॉकी संघाचे जगभरामध्ये कौतुक केले जात आहे. परंतु अनेक भारताचे हॉकी पाहणारे चाहते निराश देखील आहेत. कारण भारताचा दिग्गज गोलकिपर पीआर श्रीजेश याने हॉकी संघामधून निवृत्ती घेतली आहे. पीआर श्रीजेश हा जागतिक स्तरावर सर्वात्तम गोलकिपर म्हणून त्याची ओळख आहे. त्याला भारतीय हॉकी संघाची वॉल म्हणून जगभरामध्ये ओळखले जाते. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय हॉकी संघाला मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भारतीय हॉकी संघाचा नवा गोलकिपर कोण असणार असा चाहत्यांना प्रश्न आहे. जेव्हा पीआर श्रीजेश संघाबाहेर असायचा तेव्हा त्याची साथ कृष्णा पाठक देत होता. परंतु पाठकला जास्त वेळ मैदानामध्ये येण्याची संधी मिळाली नाही. सध्या भारतीय हॉकी संघाच्या गोलकिपरच्या यादीमध्ये या तीन खेळाडूंची नावे समोर आली आहे यावर एकदा नजर टाका.
कृष्णा पाठक हा भारतीय संघाचा सध्याचा सर्वात अनुभवी गोलकीपर आहे. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कृष्णाने आतापर्यंत १२५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दोन आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकून त्याने आपली योग्यता सिद्ध केली आहे. श्रीजेशसोबत एफआयएच प्रो लीगमध्ये खेळताना त्याने वेगवेगळ्या क्वार्टरमध्ये गोलकीपिंगची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कृष्णाला सध्या भारतीय गोलकीपिंगच्या जबाबदारीसाठी सर्वात मजबूत उमेदवार मानले जात आहे.
पवन मलिक हा भारतीय हॉकीच्या उदयोन्मुख गोलरक्षकांपैकी एक आहे. त्याने गेल्या वर्षी राउरकेला येथे एफआयएच प्रो लीगमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या पहिल्या डावाने प्रेक्षकांना प्रभावित केले. २०२१ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतही त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
सूरज करकेरा गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रीय संघाचा भाग आहे, मात्र त्याने आतापर्यंत केवळ ४३ सामने खेळले आहेत. २०१७ आशिया चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेल्या सूरजने आपले गोलकीपिंग कौशल्य सिद्ध केले आहे. नुकत्याच ओमान येथे झालेल्या हॉकी ५ च्या विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले होते.