
आशिया चषकाची ट्रॉफी भारताला का मिळत नाहीये? PCB पुढे ICC आणि BCCI नरमले? (Photo Credit- X)
नकवींनी ट्रॉफी घेऊन जाण्याचा नेमका वाद काय?
मिळालेल्या रिपोर्टनुसार, दुबईतील एशियन क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) कार्यालयात ट्रॉफी उपलब्ध नाही. ACC च्या पहिल्या मजल्यावर किंवा ACC प्रमुख मोहसिन नकवी यांच्या चेंबरमध्येही ट्रॉफी सापडली नाही. ACC स्टाफने सांगितले की ट्रॉफी अबू धाबीमध्ये आहे, पण नकवी ती आपल्यासोबत पाकिस्तानला घेऊन गेले आहेत का, याची पुष्टी होऊ शकली नाही.
भारताने नाकारला सन्मान
आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला धुळीत मिळवल्यानंतर भारतीय संघाने पीसीबी (PCB) प्रमुख मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. पाकिस्तानचे गृहमंत्री असलेले ACC प्रमुख मोहसिन नकवी या प्रकारामुळे नाराज झाले आणि ते ट्रॉफी घेऊन निघून गेले.
वादावर ICC बैठकीत चर्चा
या मुद्द्यावर आयसीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये (४ ते ७ नोव्हेंबर) चर्चा झाली होती. ८ नोव्हेंबर रोजी बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजीत सैकिया यांनी माहिती दिली की, बैठकीत पीसीबीचे चेअरपर्सन नकवी उपस्थित होते. सैकिया यांनी सांगितले की, औपचारिक बैठकीच्या अजेंड्यात ट्रॉफीचा मुद्दा नव्हता, पण आयसीसीने दोन्ही पक्षांसाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक आयोजित केली.
सैकियां म्हणाले “या समस्येवर लवकरच तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्ष काम करतील. आता वातावरण शांत झाले आहे, त्यामुळे अनेक पर्यायांवर विचार केला जाईल. दुसऱ्या बाजूकडूनही पर्याय येतील आणि आम्हीही आपापले पर्याय देऊन सहमतीने तोडगा काढू.”
बीसीसीआय आक्रमक नाही
बीसीसीआयचे उच्च अधिकारी सध्या ट्रॉफी परत आणण्यावर फारसा जोर देत नाहीत. कारण, भारत पुढील वर्षी श्रीलंकेसोबत टी-२० वर्ल्ड कपचे (T20 World Cup) आयोजन करणार आहे आणि बोर्डला नवीन वादामुळे वर्ल्ड कपच्या वातावरणावर परिणाम करायचा नाहीये. सध्या तरी टीम इंडियाला आशिया चषकाची ट्रॉफी कधी मिळणार, याबद्दल कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नाहीये.