IPL सुरू होण्यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांचा मोठा धमाका! Airtel आणि Vi ने JioHotstar सब्सक्रिप्शनसह लाँच केले नवे रिचार्ज प्लॅन
आयपीएल 2025 आजपासून सुरू होणार आहे. आज 22 मार्चला पहिला सामना खेळला जाणार आहे. आयपीएल 2025 मधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आज शनिवारी संध्याकाळी खेळला जाणार आहे. आजचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (व्हीआय) ने निवडक प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर नवीन मनोरंजन फायदे जाहीर केले आहेत. दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी नवीन अॅड-ऑन पॅक सादर केले आहेत, जे सक्रिय पॅकसह रिचार्ज केल्यावर JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतात. ज्यामुळे तुम्ही या आयपीएलची मजा घेऊ शकता आणि तुमच्या आवडत्या संघाला सपोर्ट करू शकता.
JioHotstar ही एक स्ट्रीमिंग सेवा आहे जी JioCinema आणि Disney+ Hotstar च्या एकत्रीकरणानंतर अलीकडेच भारतात लाँच करण्यात आली आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना आगामी आयपीएल सामने तसेच चित्रपट, शो, अॅनिमे आणि माहितीपट मोबाईल आणि टीव्हीवर 4K मध्ये स्ट्रीम करता येतील. तुम्हाला देखील JioHotstar वर आयपीएल सामन्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (व्हीआय) च्या प्रीपेड प्लॅनचा विचार करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेलिकॉमटॉकच्या एका अहवालानुसार, एअरटेलने जिओहॉटस्टारच्या मोफत सबस्क्रिप्शनसह दोन नवीन क्रिकेट पॅक लाँच केले आहेत. 100 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह एकूण 5 जीबी डेटा ऑफर केला जातो. याशिवाय, या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसांसाठी JioHotstar चा मोफत अॅक्सेस देखील मिळेल. तसेच, 115 रुपयांच्या प्लॅनमध्ये, 15 जीबी डेटासह 90 दिवसांचे ओटीटी स्ट्रीमिंग सर्व्हिस सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे. त्याची वैधता देखील 90 दिवसांची आहे.
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की दोन्ही प्रीपेड रिचार्ज पॅक डेटा व्हाउचर आहेत आणि त्यात कॉलिंग बेनिफिट्स समाविष्ट नाहीत. म्हणून, या रिचार्ज प्लॅनसोबतच तुमच्याकडे सक्रिय बेस पॅक असणे आवश्यक आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही कॉलिंग आणि इंटरनेट डेटा दोन्ही सेवांचा आनंद घेऊ शकणार आहात.
दुसरीकडे, व्होडाफोन आयडिया (Vi) आता एक डेटा व्हाउचर आणि दोन स्वतंत्र प्रीपेड रिचार्ज पॅक देत आहे जे JioHotstar सबस्क्रिप्शन ऑफर करतात. जर तुम्ही Vi चे ग्राहक असाल, तर IPL 2025 पाहण्याचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे 101 रुपयांचा डेटा व्हाउचर. यामध्ये ग्राहकांना तीन महिन्यांच्या JioHotstar सबस्क्रिप्शनसह 5 जीबी डेटा मिळेल. त्याची वैधता 30 दिवस आहे. तथापि, यासाठी सक्रिय बेस रिचार्ज पॅक देखील आवश्यक असेल.
याशिवाय, Vi ग्राहक 239 आणि 399 रुपयांच्या पॅकसह रिचार्ज करू शकतात. पहिल्या 239 च्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, 2 जीबी डेटा, 300 एसएमएस आणि जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन ऑफर केले जातं. तर, दुसऱ्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 2 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि त्याच कालावधीसाठी जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळते. या दोन्ही योजना स्वतंत्र आहेत आणि यांचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बेस रिचार्ज प्लॅनची गरज नाही.