
Raigad News: महाडमध्ये इतिहास घडला! पहिले ‘AI सेंटर’ सुरू, तालुक्याला मिळाली टेक्नॉलॉजीची नवी ओळख
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही स्पेशलिटी केमिकल्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने या सेंटरची स्थापना केली आहे. रामचंद्र सुर्वे यांच्याहस्ते बुधवारी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन किशोर धारिया, प्रिव्हीतर्फे विनोद देशमुख व पराग हेलेकर, रंगसुगंध अध्यक्ष सुधीर शेठ, ट्रस्ट डायरेक्टर सोनाली धारिया, विश्वस्त संतोष बुटाला, शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती राजप्पन, महाविद्यालय प्राचार्य सुदेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
याप्रसंगी बोलताना किशोर धारिया म्हणाले की, आज जग कृत्रिम बुद्धिमतेच्या सहाय्याने वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षणासोबत सर्वांगीण बौद्धिक व कौशल्याधारित अभ्यासक्रमाची जोड आवश्यक आहे. आपल्या तालुक्यातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नयेत, या उद्देशाने या ए.आय. सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी प्रिव्ही कंपनीने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.
रामचंद्र सुर्वे यानी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्याथ्यांना व पालकांना संबोधित करताना सांगितले की, केवळ पदवी शिक्षणावर समाधान मानण्याचा काळ आता संपला आहे. भविष्यात नोकरी, उद्योग किवा व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात ए. आय. तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे. पदवी अभ्यासक्रमासोबत जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारी आधुनिक तंत्रज्ञान कौशल्ये आत्मसात केली, तर विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी खुल्या होतील. महाडसारख्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या या प्रगत सेंटरचा लाभ घेत संपूर्ण तालुक्यातील विद्याथ्यांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांपासून विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हे प्रशिक्षण खुले असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये देखील या सेंटरच्या निर्मितीने समाधानाचे वातावरण आहे.