Google Maps कडून झाली मोठी गडबड, युजर्सचा उडाला गोंधळ! अॅपवर दिसू लागल्या लाल रेषा; काय आहे संपूर्ण प्रकरण?
कल्पना करा की तुम्ही एखाद्या देशात बाय रोड फिरायला जात आहे. या प्रवासासाठी तुम्ही गुगल मॅपचा वापर करत असाल आणि अर्धा प्रवास पूर्ण केल्यानंतर तुम्हाला समजलं की, या देशातील सर्व हायवे बंद करण्यात आले आहेत तर? अशीच घटना जर्मनीमध्ये घडली आहे. गुगल मॅपने जर्मनीमध्ये सर्व हायवे बंद असल्याचं सांगितलं, ज्यामुळे तेथील वाहन चालकांचा प्रचंड गोंधळ उडाला. गुगल मॅप्सवर अचानक सर्व हायवे बंद असल्याचं दाखवल्याने नक्की कोणत्या रस्त्याने प्रवास करायचा हेच युजर्सना समजत नव्हतं.
मिळालेल्या माहितीनुसार, ही गडबड प्रवासाच्या व्यस्त वेळेत झाली. काही तासांसाठी हे प्रकरण सुरु होतं. घडलं असं की, गुगल मॅप्समध्ये जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलँड्सच्या काही भागांमध्ये संपूर्ण महामार्ग बंद असल्याचे दाखवण्यात आले. अॅपमध्ये लाल बिंदूद्वारे हा इशारा देण्यात आला होता की, जर्मनी देशातील सर्व हायवे बंद आहेत. यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. (फोटो सौजन्य – Pinterest)
हायवे बंद असल्याच्या सूचना मिळताच वाहन चालकांनी छोटे रस्ते आणि गल्ल्यांमधून गाड्या नेण्यास सुरुवात केली. पण, थोड्याच वेळात, लहान रस्त्यांवरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली, ज्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आणि सर्व रस्ते पूर्णपणे बंद झाले. यानंतर, लोकांना बराच वेळ वाट पहावी लागली. वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. यानंतर पोलीस आणि ट्रॅफिक कंट्रोल सेंटर्सवर कॉल्स सुरु झाले. कोणते नॅशनल शटडाउन किंवा अपातकालीन परिस्थितीसाठी हायवे बंद ठेवण्यात आले आहेत का याची लोकं विचारपूस करू लागले. या सर्वानंतर चौकशी सुरु झाली आणि गुगल मॅपकडून झालेली गडबड समोर आली.
गुगलने नंतर सांगितले की ही समस्या केवळ काही तासांसाठीच निर्माण झाली होती आणि गुरुवारी दुपारपर्यंत मॅप्स पुन्हा सामान्य झाले होते, ज्यामध्ये फक्त प्रत्यक्ष रस्ते बंद असल्याचे दाखवले गेले होते. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, गुगल मॅप्सला सार्वजनिक डेटा, थर्ड-पार्टी प्रोवाइडर्स आणि यूजर रिपोर्ट्स यासारख्या अनेक वेगवेगळ्या स्रोतांकडून ट्रॅफिक माहिती मिळते. कंपनी आता चूक कुठे झाली याचा शोध घेत आहेत.
जे लोक अॅपल मॅप्स किंवा वेज सारखे इतर अॅप्स वापरत होते किंवा फक्त रेडिओवर ट्रॅफिक अपडेट्स ऐकत होते त्यांना अशा प्रकारची ट्रॅफिक जामची समस्या येत नव्हती. त्यांना महामार्गावरील वाहतुकीची योग्य माहिती मिळत होती. परंतु जे लोकं गुगल मॅप्सच्या मदतीने प्रवास करत होते, त्यांना ट्रफिकचा सामना करावा लागला. गुगल मॅप्समध्ये बिघाड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी मार्चमध्ये काही युजर्सना असे आढळले की त्यांची टाइमलाइन, तुम्ही कुठे आहात हे ट्रॅक करणारे फीचर गायब झाले आहे. काहींनी तर तो डेटा कायमचा गमावला. यामुळे लोकांना खूप समस्या आल्या.