2025 मधील सर्वात मोठी कारवाई! Google ने YouTube वरून हटवले तब्बल 11 हजार चॅनल्स, काय आहे कारण? जाणून घ्या
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यापैकी एक असलेल्या गूगलने 2025 मधील सर्वात मोठी कारवाई केली आहे. गुगलने त्यांच्या मालकीचे व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube वरून तब्बल 11 हजार चॅनल्स आणि अकाऊंट हटवले आहेत. CNBC आणि गूगलने शेअर केलेल्या ऑफिशियल ब्लॉग रिपोर्टनुसार, हे चॅनेल राज्य-पुरस्कृत प्रचार पसरवण्यात गुंतलेले होते. हे चॅनेल्स आणि अकाऊंट चीन आणि रशियासोबत जोडलेले होते. याच सर्वांचा विचार करून टेक कंपनी गुगलने युट्यूबवरून 11 हजार चॅनेल्स हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलचे हे पाऊल डिजिटल प्लॅटफॉर्मवर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीविरुद्ध सुरु असलेल्या जागतिक मोहिमेचा एक भाग आहे.
हटवण्यात आलेल्या चॅनेल्समध्ये चिनी आणि इंग्रजी भाषेतील कंटेट मोठ्या प्रमाणात अपलोड केला जात होता. या कंटेटमध्ये चीनचे सरकार आणि राष्ट्रपति शी जिनपिंग यांच्या राजनितीचे समर्थन केले जात होते. यासोबतच हे चॅनेल्स अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरही भाष्य करत होते. गुगलच्या Threat Analysis Group ने हे चॅनेल ओळखले आहेत आणि आता त्यांना व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवरून हटवण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगलने शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, सुमारे 2,000 यूट्यूब चॅनल्स विविध भाषांमध्ये व्हिडीओ पोस्ट करत होते. हे चॅनेल रशियाला पाठिंबा देत होते आणि त्याच वेळी युक्रेन, नाटो आणि पाश्चात्य देशांवर टीका करत होते. हे देखील गुगलच्या डिसइंफॉर्मेशन मोहिमेचा एक भाग होता.
गूगलने रशियाची राज्य-नियंत्रित मीडिया कंपनी RT सोबत जोडलेल्या 20 यूट्यूब चॅनेल्स, 4 जाहिराती अकाऊंट आणि 1 ब्लॉग देखील डिलीट केला आहे. गुगलने यापूर्वीच मार्च 2022 मध्ये RT चे मुख्य यूट्यूब चॅनल्स ब्लॉक केले आहे. जेव्हा रशियाने यूक्रेनवर हल्ला केला होता, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता.
गूगलने अझरबैजान, ईरान, तुर्की, इस्रायल, घाना आणि रोमानिया या देशांशी संबंधित असलेल्या अकाऊंटवर कारवाई केली आहे. हे अकाउंट्स राजकीय प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य करत होती आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष आणि अंतर्गत निवडणुकांसारख्या प्रादेशिक मुद्द्यांवर दिशाभूल करणारा कंटेट पसरवत होते.
गुगलच्या मते, 2025 च्या सुरुवातीपासून, प्रचार किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात सहभागी असलेले 30,000 हून अधिक YouTube चॅनेल आणि अकाउंट प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले आहेत. गुगल युट्यूबवरील कंटेटवर बारकाईन नजर ठेऊन आहे. YouTube चॅनेलवर कोणताही चुकीचा कंटेट आढळला तर त्यावर लगेच कारवाई केली जात आहे. ज्यामुळे इतर युजर्सना कोणताही धोका निर्माण होत नाही आणि त्यांची सुरक्षा टिकून राहते.