iPhone Air: कोण आहे अबिदुर चौधरी? ज्याने तयार केला सर्वात पातळ iPhone, फार रंजक आहे कहाणी
Apple ने एक असा आयफोन तयार केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन आहे. अलीकडेच आयोजित करण्यात आलेला ईव्हेंटमध्ये कंपनीने iPhone Air हा स्लिम आयफोन लाँच केला आहे. iPhone Air हा एक पातळ आणि छोटा स्मार्टफोन आहे, यामध्ये टाइटेनियम बॉडी देण्यात आली आहे. या आयफोनची किंमत 256GB मॉडलसाठी 1,19,900 रुपये ठेवण्यात आली आहे.
सध्या सर्वत्र iPhone Air चर्चेत आहे, त्याचप्रकारे आता हा आयफोन तयार करणारा डिझाईनर देखील सध्या चर्चेत आहे. हा आयफोन कोणत्या डिझाईनरने तयार केला आहे, तुम्हाला माहिती आहे का? iPhone Air सोबत सध्या सर्वत्र अबिदुर चौधरी या नावाची देखील चर्चा सुरु आहे. अमेरिकेतील टेक दिग्गज Apple मध्ये अबिदुर चौधरी हे इंडस्ट्रियल डिझाइनर आहेत. कंपनीने लाँच केलेले हे नवीन डिव्हाईस गेल्या अनेक डिव्हाईसपेक्षा पातळ आहे. यामध्ये टेलीफोटो लेंसवाला सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे आणि फोटोग्राफीसाठी या आयफोनमध्ये AI चा वापर करण्यात आला आहे. अबिदुर चौधरीने क्यूपर्टिनोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाँच ईव्हेंटमध्ये सांगितलं की, हे एक कोडे आहे ज्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या हातात अनुभवावे लागेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
अबिदुर चौधरीचा जन्म आणि बालपण लंदन आणि इंग्लडमध्ये झालं आहे. अबिदुर सध्या सैन फ्रांसिस्कोमध्ये वास्तव्यास आहेत, इथे ते सध्या डिझाईनर म्हणून काम करत आहेत. अबिदुर चौधरींचं म्हणणं आहे की, ते एक अशी व्यक्ती आहेत ज्यांना ‘समस्या सोडवणे आणि नवीन गोष्टी शिकणे आवडते’, त्यांची अशी उत्पादने तयार करण्याची इच्छा आहे, ज्याशिवाय लोक जगू शकत नाहीत.
त्यांनी लफबरो यूनिवर्सिटीमधून प्रोडक्ट डिजाइन आणि टेक्नोलॉजीमध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केली आहे. विद्यार्थी असाताना त्यांनी अनेक प्रमुख पुरस्कार जिंकले ज्यात 3D हब्स स्टुडंट ग्रँट, जेम्स डायसन फाउंडेशन बर्सरी, केनवुड अप्लायन्सेस अवॉर्ड आणि सेमोर पॉवेल डिझाइन वीक स्पर्धेत प्रथम क्रमांक यांचा समावेश आहे. त्यांच्या ‘Plug and Play’ डिझाईनसाठी त्यांना 2016 मध्ये Red Dot Design Award देखील मिळाले होते, जसे की त्यांनी LinkedIn प्रोफाइलमध्ये सांगितलं आहे.
त्यांनी यूकेमध्ये Cambridge Consultants आणि Curventa मध्ये इंटर्नशिप केली आहे. त्यानंतर अबिदुर चौधरी यांनी लंडनमध्ये Layer Design कंपनीमध्ये इंडस्ट्रियल डिझाईनरच्या पदावर काम केलं आहे. 2018 ते 2019 पर्यंत त्यांनी स्वतःची कन्सल्टन्सी ‘अबिदूर चौधरी डिझाइन’ चालवली जिथे त्यांनी उत्पादने, अनुभव आणि डिझाइन धोरणे देण्यासाठी डिझाइन एजन्सी, नाविन्यपूर्ण कंपन्या आणि स्टार्टअप्सशी सहयोग केला. जानेवारी 2019 मध्ये त्यांनी Apple कंपनी जॉईन केली. जिथे त्यांनी क्यूपर्टिनो, कॅलिफोर्नियामध्ये इंडस्ट्रियल डिझाईनरच्या पदावर काम केलं आहे. येथे त्यांनी कंपनीच्या काही सर्वात नाविन्यपूर्ण उत्पादनांवर काम केले आहे, ज्यात नवीन आयफोन एअरचा समावेश आहे.