Android युजर्ससाठी गुड न्यूज! सर्व स्मार्टफोन्स आणि टिव्हीवर मिळणार Apple TV ची मज्जा, कंपनीने केली घोषणा
तुम्ही अँड्रॉईड युजर आहात आणि तुम्हाला Apple TV+ चा आनंद घ्यायचा आहे का? पण यासाठी अॅपल डिव्हाईस खरेदी करावं लागेल, असाच विचार करताय ना? तर नाही, आता तुम्ही तुमच्या अँड्रॉईड डिव्हाईसवर Apple TV+ ची मजा घेऊ शकणार आहात. Apple TV+ पाहण्यासाठी आता तुमच्याकडे आयफोन किंवा अॅपलचं इतर कोणतही डिव्हाईस असण्याची गरज नाही. अॅपलने आता त्यांचं Apple TV+ अॅप अँड्रॉईड युजर्ससाठी देखील लाँच केलं आहे. त्यामुळे आता कोणताही स्मार्टफोन युजर Apple TV+ पाहण्यास सक्षम असणार आहे.
Snapdragon 6 Gen 4: मिड-रेंज स्मार्टफोन्ससाठी क्वालकॉम घेऊन आलाय नवा प्रोसेसर, हे आहेत खास फीचर्स
Apple TV+ लाँच केल्यानंतर आता जवळपास 5 वर्षांनी, Apple ने अँड्रॉइड स्मार्टफोन, टॅब्लेट आणि फोल्डेबल डिव्हाइसेससाठी त्यांचे टीव्ही अॅप लाँच केले आहे. यामुळे, अँड्रॉइड फोनवर Apple TV+ कंटेंट स्ट्रीम करण्याचा एक सोपा मार्ग निर्माण झाला आहे. आता तुम्ही तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनच्या गुगल प्ले स्टोअरवरून Apple TV+ अॅप इंस्टॉल करू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजपासून, अँड्रॉइड वापरकर्ते त्यांच्या डिव्हाइसवर अॅपल टीव्ही अॅप डाउनलोड करू शकतील. कारण अॅपल टिव्ही अॅप आता गुगल प्ले स्टोअरवर लाईव्ह झाले आहे. याआधी, अँड्रॉइड युजर्स Apple TV+ कंटेंट स्ट्रीम करू शकत होते, परंतु यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागत होता. यासाठी त्यांना वेब ब्राउझर किंवा प्राइम व्हिडिओचा वापर करावा लागत होता. ज्यामुळे युजर्सना अॅपल टिव्ही वापरणं फार त्रासदायक ठरत होतं. मात्र आता असं होणार नाही. कारण आता अॅपल टिव्ही गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झालं आहे. त्यामुळे युजर्सना अॅपल टिव्हीचा आनंद घेण्यासाठी कोणत्याही इतर अॅपचा सपोर्ट घेण्याची गरज नाही. आता अँड्रॉइड वापरकर्ते कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या डिव्हाइसवर Apple TV+ कंटेंट स्ट्रीम करू शकणार आहेत.
अॅपल बऱ्याच काळापासून अँड्रॉईड डिव्हाईसवर त्यांची Apple TV+ सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात, कंपनीने अँड्रॉइडसाठी Apple TV+ अॅप आणण्याचे संकेत दिले होते आणि आता ते उपलब्ध झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की याआधीही अॅपलचे काही अॅप्स अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये अॅपल म्युझिक, अॅपल म्युझिक क्लासिक आणि ट्रॅकर डिटेक्ट इत्यादींचा समावेश आहे.
नवीन अॅपमध्ये किंमतीत कोणताही बदल नाही. भारतात, 99 रुपयांच्या मासिक सबस्क्रिप्शनवर Apple TV+ कंटेट स्ट्रीम केले जाऊ शकते आणि नवीन वापरकर्त्यांना एका आठवड्याची मोफत ट्रायल देखील दिली जाणार आहे. या सबस्क्रिप्शनमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत. वापरकर्त्यांना अॅपमध्ये ऑफलाइन डाउनलोड, वॉचलिस्ट, कंटिन्यू वॉचिंग यासारख्या अनेक सुविधा मिळतील. तथापि, अँड्रॉइड वापरकर्त्यांना गुगल कास्ट सपोर्टसाठी थोडी वाट पहावी लागेल.