पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन D9 – 9000 HP इलेक्ट्रिक इंजिनचे उद्घाटन, ८०० दशलक्ष टन CO₂ उत्सर्जनाची होणार बचत
भारतीय रेल्वेच्या दाहोद (गुजरात) येथील कारखान्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन D९ – ९००० HP इलेक्ट्रिक इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे. सिमेन्स कंपनीला ९००० HP क्षमतेच्या १२०० इलेक्ट्रिक इंजिनांच्या डिझाइन, अभियांत्रिकी, उत्पादन आणि देखभाल यासाठी दिलेल्या करारानंतर, नाशिक, औरंगाबाद आणि मुंबई येथील सिमेन्स कारखान्यांमध्ये या प्रकल्पासाठी महत्त्वाचे घटक तयार केले जात आहेत. अंतिम असेंब्ली, चाचणी आणि कार्यान्वयन दाहोद येथील भारतीय रेल्वेच्या कारखान्यात केलं जात आहे.
अत्याधुनिक दाहोद केंद्र व्हर्च्युअल रिअॅलिटी-आधारित सुरक्षा प्रशिक्षण, लोकोमोटिव्ह सिम्युलेटर आणि लोको-शंटरसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. याची उभारणी अवघ्या दोन वर्षांत करण्यात आली आहे. याच केंद्रात आता अंतिम असेंब्ली, चाचणी आणि कार्यान्वयन केलं जाणार आहे. या उद्घाटन समारंभावेळी सिमेन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील माथूर यांनी या प्रकल्पाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सिमेन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील माथूर यावेळी म्हणाले की, “भारतीय रेल्वेसोबत या प्रतिष्ठित प्रकल्पात भागीदारी करताना सिमेन्स लिमिटेडला अभिमान वाटत आहे. आम्ही एक जागतिक दर्जाचा कारखाना उभारला असून ९००० HP इलेक्ट्रिक इंजिनासाठी सुमारे ९० टक्के तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आलं आहे. या प्रगत इंजिनांची ओळख भारत सरकारच्या मालवाहतूक क्षेत्रातील वाटा २७ टक्क्यांवरून सुमारे ४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या उद्दिष्टासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हा भारतीय रेल्वे आणि सिमेन्स दोघांसाठीही एक उल्लेखनीय टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जागतिक दर्जाच्या कारखान्यात तयार केलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनाचे उद्घाटन केल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आणि गौरव वाटतो.”
प्रत्येक ९००० HP इंजिनाची कमाल गती १२० किमी/तास असून, यामध्ये ५८०० टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे. ही इंजिने भारताच्या विस्तृत रेल्वे नेटवर्कवर कार्यक्षम मालवाहतूक करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. Siemens कंपनी या इंजिनांची ३५ वर्षांच्या संपूर्ण आयुष्यमानासाठी देखभाल करणार आहे. ही इंजिने सिमेन्सच्या रेलिजेंट X प्लॅटफॉर्मसह सुसज्ज असून, पूर्वानुमानाधारित देखभालीसाठी वापरली जातील, ज्यामुळे उच्चतम कार्यक्षमता आणि उपलब्धता सुनिश्चित होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. प्रगत डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली, कवच सुरक्षा प्रणाली आणि ग्रीन प्रोपल्शन तंत्रज्ञानामुळे ही इंजिने आधुनिक रेल्वे वाहतुकीचे प्रतीक ठरणार आहेत.