Google I/O 2025: वारंवार ऑफर चेक करण्याची गरज नाही, किंमत कमी होताच येणार Alert! ग्राहकांच्या बचतीसाठी Google घेऊन येतोय नवीन फीचर
Google I/O 2025 या दोन दिवसीय ईव्हेंटमध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट सादर केले आहेत. या ईव्हेंटमध्ये Gemini मॉडेलमध्ये नेटिव्ह ऑडियो आउटपुट फीचर, डेव्हलपर्ससाठी नवीन टूल्स, Deep Think, ऑल न्यू Deep Think अॅडवांस रीजनिंग मोड, 3D व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, अॅडव्हान्स AI इमेज आणि व्हिडिओ जनरेशन टूल्स, असे अनेक नवीन अपडेट सादर करण्यात आले आहेत. याशिवाय आता कंपनीने आणखी एक नवीन फीचर युजर्ससाठी सुरु केलं आहे. खरं तर ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या युजर्ससाठी हे फीचर अत्यंत फायद्याचं ठरणार आहे.
Infinix च्या नव्या 5G स्मार्टफोनची बाजारात एंट्री, गेमर्ससाठी ठरणार वरदान! किंमत तुमच्या बजेटमध्ये
गूगलने Google I/O 2025 ईव्हेंटमध्ये ऑनलाइन शॉपिंगसाठी अनेक नवीन AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) फीचर्स सादर केले आहेत. या फीचर्समुळे ऑनलाईन शॉपिंग अधिक मजेदार होणार आहे. शिवाय ग्राहकांची बचत देखील होणार आहे. हे फीचर कसं काम करणार आणि याच्या मदतीने युजर्स कशा प्रकारे बचत करू शकतात याबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता Google Search मध्ये नवीन AI मोड दिला जाणार आहे, जिथे तुम्ही कोणत्याही प्रोडक्टचा फोटो अपलोड करू शकता आणि त्याबाबत AI कडून माहिती मिळवू शकता. तुम्हाला हे प्रोडक्ट खरेदी करायचं असेल पण त्याची किंमत जास्त असेल तर चिंता करण्याची गरज नाही. हे नवीन फीचर तुम्हाला त्या प्रोडक्टची किंमत कमी झाल्यावर अलर्ट पाठवणार आहे आणि यासाठी तुम्हाला सतत प्रोडक्टवरील ऑफर्स आणि डिस्काऊंट तपासण्याची देखील गरज नाही. मात्र यासाठी तुम्हाला काही सेटिंग करावी लागणार आहे.
एखाद्या प्रोडक्टची किंमत जास्त असेल तर युजर्स त्या प्रोडक्टची खरेदी करण्यासाठी किंमत कमी होण्याची वाट बघतात. यासाठी प्रोडक्टवरील ऑफर्स वारंवार चेक केल्या जातात. पण आता तुम्हाला या त्रासातून सुटका मिळणार आहे. कारण आता किंमत कमी होताच गुगल स्वतः वापरकर्त्यांना माहिती देईल.
ऑनलाईन शॉपिंग अधिक सोपी व्हावी यासाठी हे नवीन फीचर सुरु केलं जाणार आहे. येत्या काही महिन्यात हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. आता तुम्ही कोणत्याही प्रोडक्ट लिस्टिंगवर किंमत ट्रॅक करा वर टॅप करू शकाल. तुम्ही एखादे प्रोडक्ट निवडू शकता, ते रंग आणि आकारानुसार फिल्टर करू शकता आणि त्या वस्तूवर तुम्हाला किती खर्च करायचा आहे ते ठरवू शकता. जेव्हा तुम्ही ठरवलेली किंमत त्या वस्तूवर उपलब्ध असेल तेव्हा तुम्हाला गूगलकडून नोटिफिकेशन पाठवलं जाणार आहे.
तुम्ही निवडलेल्या वस्तूच्या किंमतीवर गूगल नजर ठेवणार आहे. जेव्हा संबंधित प्रोडक्टची किंमत तुम्ही ठरवलेल्या किंमतीशी जुळते तेव्हा कंपनी तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवेल. यानंतर तुम्ही बाय फॉर मी पर्यायावर टॅप करून वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही बाय फॉर मी बटणावर क्लिक केल्यानंतर, Google व्यापाऱ्याच्या वेबसाइटवरील शॉपिंग कार्टमध्ये आयटम जोडेल आणि खरेदी सुरक्षित करण्यासाठी तुमचे Google Pay तपशील वापरेल.