रशियन न्यायालयाने गुगलवर ठोठवला 20 ट्रिलियन डॉलर्सचा दंड
मास्को: रशियन न्यायालयाने गुगलवर दंड ठोठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 ट्रिलियन डॉलर्सचा दंड रशियाने गुगलवर ठोठवला आहे. हा दंड संपूर्ण जगाच्या एकत्रित जीडिपीच्या तब्बल 620 पटीने जास्त आहे. यामागचे कारण देताना रशियन न्यायालयाने सांगितले की, गुगलने रशियातील 17 प्रो-रशियन युट्यूब चॅनेल आणि इतर आणखी काही चॅनेलवर बंदी घातल्याने हा दंड आकारण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2020 मध्ये गुगलने या चॅनेल्सवर बंदी घातली होती.
2020 मध्ये रशियाच्या चॅनेल्सवर गुगलने बंदी घातली होती
गुगलने 2020 मध्ये रशियाच्या 17 प्रो-रशियन या चॅनेलवर व इतर बंदी घातली होती. यानंतर न्यायालयता याविरोधात चॅनेलने कोर्टात केस दाखल केली होती. या चॅनेल्समध्ये रशियाच्या सरकारी वाहिनी रशिया-1 चाही समावेश होता. यावर निर्णय घेताना न्यायालयाने, 2020 मध्ये, गुगलला दररोज 1 लाख रूबल दंड आकारण्याचे आदेश दिले होते. या दंडात रोज 24 तासांनी दुप्पट वाढ केली जाण्याची तरतूद होती. नऊ महिन्यांच्या मुदतीत दंड न भरल्याने ही रक्कम आज 20 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.
अजूनही रशियात गुगलचे सर्च इंजिन व यूट्यूब सेवा कार्यरत
या दंडामुळे गुगलच्या सेवांवर त्वरित परिणाम होणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. 2022 मध्ये रशियात गुगलला दिवाळखोर घोषित करण्यात आले होते. मात्र, गुगलचे सर्च इंजिन व यूट्यूब सेवा रशियात त्यानंतरही कार्यरत आहेत. दरम्यान, रशियाने फेसबुक व एक्स या सामाजिक माध्यमांवर बंदी घातली आहे. पण गुगलवर रशियामध्ये बंदी नाही.
भारत आणि ब्रिटनेही गुगलवर दंड ठोठावला होता
गेल्या काही वर्षांत गुगलला विविध देशांतून दंड ठोठावण्यात आला आहे. अनुचित व्यवसाय प्रथा आणि बाजारातील वर्चस्वाचा गैरवापर केल्याच्या कारणास्तव भारताने ऑक्टोबर 2022 मध्ये गुगलला 1,338 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. ब्रिटनमध्येही डिजिटल जाहिरातींच्या बाजारपेठेचा गैरफायदा घेतल्याच्या कारणाने गुगलवर चौकशी सुरू आहे. याशिवाय युरोपमध्येही गुगलवर 66 हजार कोटींचा दंड ठोठावला होता. यापूर्वी 2018 मध्ये देखील 33 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
रशियाच्या न्यायालयाचा हा निर्णय गुगलसाठी एक महत्त्वाचा धक्का असून, गुगलने तात्काळ प्रतिसाद देऊन या मुद्द्यावर चर्चेसाठी रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. तथापि, हा मुद्दा गुगल आणि रशिया यांच्यातील तणावाची एक नवीन पायरी ठरू शकतो.