फोटो सौजन्य: iStock
मेटाने ‘सेफर इंटरनेट इंडिया’ या तंत्रज्ञान उद्योग संघटनेसोबत सहयोग करून एक क्रिएटर-संचालित जागरूकता उपक्रम सुरू केला आहे. ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्यांचा वाढता धोका लक्षात घेऊन वापरकर्त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
या उपक्रमाअंतर्गत क्रिएटर्ससाठी कौशल्यविकास आणि चर्चात्मक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात क्रिएटर्सना नवनवीन घोटाळे ओळखण्याचे कौशल्य दिले जाईल, मेटा प्लॅटफॉर्मवरील डिजिटल सुरक्षा साधनांचे प्रात्यक्षिक दिले जाईल आणि लोकांना घोटाळ्यांपासून जागरूक करणारा आकर्षक कंटेंट तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.
WhatsApp New Feature: आता WhatsApp वरून काढलेले फोटोही दिसतील प्रोफेशनल, नव्या अपडेटबाबत सर्व माहिती
या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘क्रिएटर्स फॉर ऑनलाइन ट्रस्ट’ हा क्रिएटर-केंद्रित कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डिजिटल क्रिएटर्स, तंत्रज्ञान कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागधारक सहभागी झाले. त्यांनी उद्योगाशी संबंधित महत्त्वपूर्ण अनुभव, केस स्टडीज शेअर केल्या आणि परस्परसंवादी गोलमेज चर्चांमध्ये विश्वासार्ह डिजिटल आवाजांची भूमिका स्पष्ट केली.
या लाँच कार्यक्रमात मेटाचे काउंटर फ्रॉडचे जागतिक प्रमुख आणि सिक्युरिटी पॉलिसी संचालक नॅथनियल ग्लेचर म्हणाले, “ऑनलाईन फसवणूक व घोटाळ्यांचा मुकाबला करण्यासाठी उद्योगाला सामूहिक कृती आणि सातत्यपूर्ण माहितीची आवश्यकता आहे. सेफर इंटरनेट इंडियासोबत आम्ही क्रिएटर्सना डिजिटल सुरक्षेच्या चर्चेत अग्रस्थान देऊ इच्छितो. आमच्या साधनांचा आणि माहितीसंपन्न पाठिंब्याचा उपयोग करून क्रिएटर्स वापरकर्त्यांना सुरक्षित, माहितीपूर्ण डिजिटल वर्तनाकडे मार्गदर्शन करतील.”
सेफर इंटरनेट इंडियाचे सह-संयोजक बर्गेस मालू म्हणाले, “क्रिएटर इकोसिस्टमला प्राधान्य देत हा अर्थपूर्ण उपक्रम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम डिजिटली सुरक्षित भारत घडवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
मेटाने नुकतीच ‘स्कॅम से बचो २.०’ ही अँटी-स्कॅम मोहिम सादर केली, ज्यामध्ये विविध क्रिएटर्ससोबत सहयोग करून मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर जनजागृती केली गेली. या मोहिमेद्वारे बनावट कर्ज, ओटीपी फसवणूक, आणि तोतयागिरीसारख्या सामान्य ऑनलाइन घोटाळ्यांविषयी लोकांना दृश्य आणि संस्कृतिकदृष्ट्या प्रभावी माध्यमातून माहिती दिली गेली.
सेफर इंटरनेट इंडिया ही सुमारे दोन डझन तंत्रज्ञान कंपन्यांची संघटना असून ती अर्धा अब्जाहून अधिक भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचते. या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेत वापरकर्त्यांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे आणि नवोन्मेषाला चालना देणे. यामध्ये डिजिटल सेवा प्रदाते, टेलिकॉम कंपन्या, फिनटेक स्टार्टअप्स आणि सुरक्षिततेशी संबंधित इतर संस्था सहभागी आहेत.