New Year 2025: नवीन वर्षासाठी व्हॉट्सॲप घेऊन आलाय खास फीचर्स, कॉलिंग होणार आणखी मजेदार
येत्या काही दिवसातंच नवीन वर्ष सुरु होणार आहे. त्यामुळे 2024 ला अलविदा करण्याचं आणि 2025 चं स्वागत करण्याची तयारी सगळीकडे सुरु झाली आहे. 2024 मध्ये व्हॉट्सॲपने आपल्या युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स रिलीज केले आहेत. या सर्व फीचर्सनंतर आता वर्षाच्या शेवटी देखील व्हॉट्सॲप त्यांच्या युजर्ससाठी एक खास फीचर घेऊन आला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्हॉट्सॲपचं हे फीचर अगदी मजेदार असणार आहे.
मॅसेज पाठवणे आणि कॉलिंगचा अनुभव सुधारण्यासाठी व्हॉट्सॲप नवीन वैशिष्ट्ये घेऊन आला आहे. कंपनीने गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे. या नवीन फीचर्समध्ये व्हॉट्सॲप युजर्स व्हिडिओ कॉल दरम्यान नवीन वर्षाच्या थीमसह नवीन कॉलिंग इफेक्टचा आनंद घेऊ शकणार आहेत. तथापि, हा फायदा केवळ मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्मने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवीन ॲनिमेशन आणि स्टिकर पॅकही लाँच केले आहेत. तसेच, मेटाच्या मालकीचे दुसरे प्लॅटफॉर्म अर्थात इंस्टाग्रामने अलीकडेच 2024 कोलाज नावाचे मर्यादित कालावधीचे फिचर रिलीज केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हॉट्सॲपच्या मते, वापरकर्ते आता सुट्टीच्या काळात व्हिडिओ कॉल करू शकतात आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी फेस्टिव बॅकग्राउंड, फिल्टर आणि इफेक्टचा वापर करू शकतात. यामध्ये ॲनिमेटेड रिॲक्शनचा देखील आनंद घेता येणार आहे. जेव्हा यूजर निवडलेल्या पार्टी इमोजीचा वापर करून मॅसेजवर रिॲक्शन देतो, तेव्हा सेंडर आणि रिसीवर दोघांसाठी कॉन्फेटी ॲनिमेशन दिसेल.
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने नवीन स्टिकर्स देखील रिलीज केले आहेत. नवीन वर्षाची थीम लक्षात घेऊन, नवीन अवतार स्टिकर्ससह क्युरेटेड न्यू इयर इव्ह (NYE) स्टिकर पॅक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. व्हॉट्सॲपने सांगितलं आहे की ही वैशिष्ट्ये मजेदार पद्धतीने सुट्टीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक उत्तम मार्ग आहेत.
अलिकडच्या आठवड्यात व्हॉट्सॲपवर जोडलेल्या वैशिष्ट्यांच्या यादीत हे वैशिष्ट्य समाविष्ट झाले आहे. गेल्या आठवड्यात, कंपनीने व्हिडिओ कॉलसाठी अनेक इफेक्ट सादर केले, ज्यात पपी इयर्स, अंडरवॉटर आणि कराओके मायक्रोफोन यांचा समावेश आहे. आता वापरकर्ते एकूण 10 इफेक्टमधून त्यांचा आवडता इफेक्ट निवडू शकतात. याव्यतिरिक्त, वापरकर्ते आता संपूर्ण चॅटमध्ये व्यत्यय न आणता ग्रुप कॉलसाठी विशिष्ट पार्टिसिपेंट्स निवडू शकतात.
व्हॉट्सॲपने यापूर्वी चॅटमध्ये रिअल-टाइम एंगेजमेंटसाठी टायपिंग इंडिकेटर सादर केले होते. त्याच्या आगमनानंतर, वापरकर्त्यांना चॅटमध्ये व्हिज्युअल चिन्हे दिसत आहेत. याशिवाय, इंडिविजुअल किंवा ग्रुप चॅटमध्ये टाइप करणाऱ्या वापरकर्त्याचा प्रोफाइल फोटो देखील विझीबल आहे.
Maha Kumbh Mela 2025: राहण्यापासून ते पार्किंगपर्यंत, हा अॅप देणार कुंभ मेळ्याचे सर्व अपडेट
नुकतेच व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट नावाचे आणखी एक फीचर देखील व्हॉट्सॲपवर जोडले गेले आहे. नावाप्रमाणेच, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना या वैशिष्ट्याद्वारे इतरांकडून प्राप्त झालेल्या व्हॉइस मॅसेजचे टेक्स्ट-आधारित ट्रान्सक्रिप्शन ऑफर करते. तथापि, केवळ रिसीवर व्हॉईस संदेशाचा ट्रांसक्रिप्ट पाहू शकतो, पाठवणारा नाही. प्लॅटफॉर्मने यावर जोर दिला आहे की ट्रान्सक्रिप्ट स्वतः डिव्हाइसवर तयार केले जातात आणि इतर कोणीही त्याची कंटेंट ऐकू किंवा वाचू शकत नाही.