
केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा 'हा' रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क (Photo Credit - X)
ब्लूटूथ तंत्रज्ञानाची सुरुवात कशी झाली?
१९९६ सालापर्यंत दोन इलेक्ट्रॉनिक उपकरणांना एकमेकांशी जोडण्यासाठी केबल्सचा वापर करावा लागत असे. ही समस्या सोडवण्यासाठी जगातील पाच मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्र येऊन एक ‘शॉर्ट रेंज वायरलेस तंत्रज्ञान’ विकसित करण्याचा निर्णय घेतला. या नवीन तंत्रज्ञानाला एक नाव हवं होतं.
राजा ‘हराल्ड ब्लूटूथ’ आणि जिम कार्डेक यांचा आयडिया
त्यावेळी इंटेल कंपनीचे इंजिनिअर जिम कार्डेक (Jim Kardach) यांनी एक नाव सुचवलं. त्यांनी नुकतेच १० व्या शतकातील डेनमार्कचे राजा हराल्ड गार्मसन (Harald Gormsson) यांच्याबद्दल एका पुस्तकात वाचलं होतं. राजा हराल्ड यांना लोक ‘हराल्ड ब्लूटूथ’ या नावाने ओळखत. कारण त्यांचा एक दात किडलेला होता आणि तो गडद निळ्या रंगाचा दिसत असे.
Photo Credit – X
राजा हराल्ड यांनी डेनमार्क आणि नॉर्वे या दोन शत्रू देशांना एकत्र करून एक साम्राज्य स्थापन केलं होतं. ज्याप्रमाणे राजा हराल्ड यांनी दोन देशांना जोडलं होतं, त्याचप्रमाणे हे नवीन वायरलेस तंत्रज्ञान वेगवेगळ्या उपकरणांना (उदा. फोन आणि लॅपटॉप) जोडणार होतं. म्हणूनच जिम कार्डेक यांनी याचं नाव ‘ब्लूटूथ’ ठेवण्याचा सल्ला दिला.
ब्लूटूथ लोगोमागील रहस्य काय?
ब्लूटूथचा लोगो फक्त डिझाईन नसून त्यामागे एक विशेष अर्थ आहे. डेनमार्कच्या प्राचीन ‘वाइकिंग रून्स’ (Viking Runes) लिपीतून हा लोगो तयार करण्यात आला आहे. डिझाइनर्सनी राजा हराल्ड ब्लूटूथ यांच्या नावातील आद्याक्षरे म्हणजेच H आणि B घेतली. वाइकिंग लिपीत H ला ᚼ (Hagall) आणि B ला ᛒ (Bjarkan) असे म्हणतात. या दोन्ही चिन्हांना एकत्र (Combine) करून आजचा ब्लूटूथचा लोगो तयार झाला आहे.