
Tech Tips: Cyber Attack झालाय? घाबरू नका! तुमचा डेटा आणि पैसे वाचवण्यासाठी सर्वात आधी करा 'ही' महत्त्वाची कामं
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा फोन किंवा कंप्युटर हॅक झाला आहे तर सर्वात आधी डिव्हाईसचे इंटरनेट कनेक्शन बंद करा. यानंतर वायफाय बंद करा आणि जर इथरनेट केबल लावली असेल तर ती काढून टाका. फोनमधील मोबाईट डेटा बंद करा. यामुळे सायबर अटॅक करणाऱ्यांपासून डिव्हाईसचे कनेक्शन तुटेल आणि मालवेअर पुढे पसरणार नाही, तसेच डेटा लीक होण्याला देखील पूर्णविराम लागेल. (फोटो सौजन्य: Pinterest)
जर तुम्ही याबाबत सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट किंवा संस्थेला माहिती दिली असेल आणि त्यांनी तुम्हाला डिव्हाईस चालू ठेवण्याचा सल्ला दिला असेल तर त्यांच्या सूचनांचे पालन करा. यामुळे तुमचा डेटा चुकीच्या हातात जाण्यापासून रोखला जाईल आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी देखील मदत होऊ शकते.
जर ईमेल, एसएमएस, व्हॉट्सॲप संदेश किंवा संशयास्पद वेबसाइटद्वारे सायबर अटॅक झाला असेल तर संबंधित लिंकवर पुन्हा क्लिक करू नका. जर तुमच्या डिव्हाईसमध्ये कोणतीही अनोळखी फाईल डाऊनलोड झाली असेल तर ती ओपन करू नका. अनेकदा तुमच्या छोट्या- छोट्या चुकांमुळे मालवेअर पुन्हा ॲक्टिव्ह होऊ शकतो. तसेच, जर तुम्हाला शंका असेल की तुमचे अकाऊंट हॅक झाले आहे तर त्वरित एका दुसऱ्या सुरक्षित डिव्हाईसवरून अकाऊंटचा पासवर्ड बदला. विशेषत: ईमेल, बँकिंग, सोशल मीडिया आणि क्लाउड स्टोरेज अकाऊंट्सना प्राधान्य द्या. अकाऊंटसाठी एक मजबूत पासवर्ड सेट करा.
शक्य असल्यास टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन ठेवा. यामुळे तुमच्या अकाऊंटसाठी सुरक्षेचा अतिरिक्त स्थर निर्माण केला जातो. जर सायबर अटॅकदरम्यान बँकिंग तपशील, कार्डची माहिती किंवा यूपीआय संबंधित माहिती लीक झाली असेल तर त्वरित तुमच्या बँकेशी संपर्क साधा.
Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
सायबर अटॅक झाल्यानंतर स्क्रीनशॉट्स, ईमेल हेडर्स, ट्रांझेक्शन डिटेल्स, फोन नंबर आणि लिंक यासारखी माहिती पुरावा म्हणून सेव्ह करा. यामुळे तक्रार करताना तुम्हाला मदत होईल. अकाऊंट हॅकिंग किंवा तुमची पर्सनल माहिती लीक झाली असेल तर तर त्वरित बँक किंवा सर्विस प्रोवाईडरला माहिती द्या. भारतात सायबर गुन्ह्यांसाठी 1930 हा टोल-फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे, ज्यावर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.