
प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक बस रस्त्याच्या कोपऱ्यावर थांबली आहे. रस्त्याच्या कडेला एक झाड असते ज्याच्या शेजारी काही लोक आराम करत असतात. यावेळीच एक माणूस झाडाच्या सावलीत शांतपणे झोपलेला असतो. मुलगी बसमधून उतरते आणि काहीतरी खुरापती करुन आपण व्हूज मिळवू या आशेने ती नको ते करायला जाते.
व्हिडिओमध्ये मुलीच्या हातात एक पाण्याची बाटली दिसते ज्यात तिने पेट्रोल भरलेले असते. ती गुपचूप झोपलेल्या व्यक्तीजवळ जाते, त्याच्या अंगावर पेट्रोल टाकते आणि लायटरने आग लावत ती तिकडून आपला पळ काढते. यानंतर मुलगी बसमध्ये जाऊन बसते तर तिचा साथीदार आपल्या कॅमेरात यापुढील दृष्य कैद करु लागतो. पुढे दिसते की, कपड्यांना हलकी आग लागताच व्यक्ती झोपेतून उठतो, तो घाबरतो आणि हाताने आग विझवण्याचा प्रयत्न करतो. आग विझवण्यासाठी जो जमिनीवर आपले शरीर देखील घासतो आणि अखेर काही सेकंदानंतर ही आग विझते. घटनेमुळे तिथे एक गोंधळ उडतो, आजूबाजूची लोक बघ्याची भूमिका बजावतात पण कुणीही मुलीच्या कृतीवर आक्षेप घेत नाही, ना व्यक्तीची मदत करण्यासाठी कुणी पुढाकार घेताना दिसतो.
सदर घटनेचा व्हिडिओ @simran_kol_9 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याला शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘खतरनाक प्रँक’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “हे अत्यंत संतापजनक आहे. जर कोणी तुमच्या वडिलांसोबत किंवा भावासोबत अशी ‘प्रँक’ (मस्करी) केली असती, तर तुम्हाला कसं वाटलं असतं, याचा विचार करा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुला काही अक्कल नाही का? एका व्हिडिओसाठी तू कोणाचा जीव घेऊ शकतेस” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा काही विनोद नाही मूर्खा, तुझ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.