
Fact Check : चालू ट्रेनमधून बिबट्याने केली शिकार... दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ओढतच काढलं बाहेर अन् थरारक Video Viral
काय आहे खरं सत्य?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अमरावती येथील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओमध्ये एक बिबट्या बडनेरा ते गोपाळ नगर दरम्यानच्या रेल्वे रुळांवर वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाडीचा पाठलाग करताना दिसून आला. व्हिडीओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अमरावती वन विभागाने या प्रकरणाची दखल घेत व्हिडीओचे सत्य सर्वांसमोर उघड केले आहे. व्हिडिओची दखल घेत जेव्हा वनविभागाने परिसराची पाहणी केली आणि व्हिडीओची तांत्रिक तपासणी केली तेव्हा त्यांना असे समजले की, हा संपूर्ण व्हिडिओ खरा नसून तो ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) द्वारे तयार करण्यात आलेला एक बनावटी व्हिडिओ आहे. वन विभागाने अधिकृतपणे सांगितले की, अशा प्रकारची कोणतीही घटना बडनेरा-गोपाळ नगर रेल्वे मार्गावर घडलेली नाही.
अलिकडे एआयद्वारे तयार केल्या जाणाऱ्या व्हिडिओजचे प्रमाण फार वाढले आहे. हुबेहुब दिसणाऱ्या या व्हिडिओजमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो आणि खोटी माहिती पसरवली जाते. एआयच्या या दुनियेत आजकाल कोणत्याही व्हिडिओवर लगेच विश्वास न ठेवात आधी त्यांची योग्य पडताळणी होणे गरजेचे झाले आहे. बिबट्याच्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ देखील त्यातीलच एक आहे. अनेकांनी व्हिडिओतील दृश्यांवर आणि यात केल्या जाणाऱ्या दाव्यावर विश्वास ठेवला. कुणीही सत्य पडताळून पाहिले नाही ज्यामुळे सर्वचजण या खोटेपणात सामील झाले, अनेकांनी हे व्हिडिओ रिशेअर देखील केले ज्यामुळे चुकीची माहिती आणखी पसरत गेली.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.