
Foreign Joggers Stop Footpath Riders in Pune
Pune Foreigner Traffic Control Video : पुणे : पुणेकर नेहमी लोकांना भाषेचे आणि ज्ञानाचे धडे देताना दिसून येतात. मात्र पुण्यामध्ये येऊन एका परदेशी व्यक्तीने पुणेकरांना वाहतुकीचे नियम सांगितले आहेत. फुटपाथवरुन जाणाऱ्या गाड्यांना त्याने रस्ता दाखवला आणि रस्त्याने गाड्या चालवण्यास सांगितले. पादचारी मार्ग हा पायी जाणाऱ्या लोकांसाठी असल्याचे तो वाहन चालकांना सांगत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यामुळे भारतीयांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव बाहेरच्या व्यक्तीला करुन द्यावी लागत असल्याची शोकांतिका समोर आली आहे. पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पुण्यातील पिंपले निलख या भागातील आहे. रक्षक चौकामध्ये एक परदेशी नागरिक भारतीय नागरिकांना वाहतुकीचे नियम शिकवताना दिसत आहे. पादचाऱ्यांसाठी असलेल्या फूटपाथवरून दुचाकीस्वारांना गाडी चालवण्यापासून तो परदेशी नागरिक थांबवताना दिसत आहे. मात्र, अनेक दुचाकीस्वार त्याचे म्हणणे दुर्लक्षित करून पुढे जाताना दिसत आहेत. या परदेशी नागरिकाने वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी गेलेल्या जीवापाड प्रयत्नाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
हे देखील वाचा : आचारसंहिता लागताच पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर; एकाच दिवसात 4819 अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी पुणेकरांवर चांगलेच तोंडसुख घेतले. बेशिस्त वाहन चालकांवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच पादचाऱ्यांसाठी असणाऱ्या मार्गावरुन वाहने घालणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील सोशल मीडियावर करण्यात आली आहे. तसेच परदेशी पाहुण्यांना हे काम करावे लागत असल्यामुळे देखील जोरदार टीका करण्यात आली. परदेशी लोकांपुढे भारताची प्रतिमा काय म्हणून जात असा सवाल एक नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या स्टाईलमध्ये बापाने साजरा केला मुलीच्या जन्माचा आनंद, स्वतः दिग्दर्शकाने कमेंट करत म्हटलं…Video Viral
सांगवी वाहतूक विभागाचे प्रभारी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी देखील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “काही लोक वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून आमच्या पोलीस विभागाला नेहमीच मदत करत असतात. आम्ही त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचे नेहमीच आभार मानतो. रक्षक चौकातील ही समस्या सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामामुळे निर्माण झाली आहे, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. पाच लेनचा रस्ता एका लेनमध्ये रूपांतरित होतो. परिणामी, वाहतूक कोंडी होते. औंध मिलिटरी स्टेशनच्या बाजूला फूटपाथ मोठा आहे आणि रस्ता अरुंद आहे; त्यामुळेच अनेक लोक त्याचा वापर करतात. आम्ही त्यांच्यावर नियमितपणे कारवाई करतो.” असे मत सांगवी वाहतूक विभागाकडून मांडण्यात आले.