पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात ४,८१९ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई
पिंपरी : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवड शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, मंगळवारी (दि.१६) दुपारी तीन वाजेपर्यंत शहरभरातील तब्बल ४ हजार ८१९ अनधिकृत राजकीय फ्लेक्स, बॅनर्स आणि फलकांवर कारवाई करण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी निवडणुकीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर तात्काळ लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने ही धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि शासकीय इमारतींच्या परिसराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यामध्ये केवळ फ्लेक्सच नव्हे, तर राजकीय किऑस्क, स्टिकर्स, होर्डिंग, पक्षांचे ध्वज, भिंतींवरील जाहिराती आणि फलक हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हेदेखील वाचा : Prithviraj Chavan : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही साहित्य लावू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.
सर्वांनी नियमांचे पालन करावे
‘निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रभाव टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाय राबविले असून, सर्वांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे’.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
तातडीने कारवाई सुरू
आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात कुठेही राजकीय जाहिरात फलक किंवा होर्डिंग राहू नयेत, यासाठी तातडीने कारवाई सुरू केली आहे. ही मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असून, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
– राजेश आगळे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
हेदेखील वाचा : वल्लभनगरमध्ये तरुणाचा जीव वाचवण्यासाठी अग्निशामक दलाची धाडसी मोहीम; मोठी दुर्घटना टळली






