Viral Video: छत्रीचा माईक… आणि PWD ची पोलखोल! (फोटो-सौजन्य- सोशलमीडिया)
या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थिनी हातात छत्री घेऊन उभी राहते आणि रस्त्याची परिस्थिती सांगताना दिसते. छत्रीचा वापर तिने चक्क माईक म्हणून केला आहे. नेहा घारे हिने रिपोर्टरची भूमिका निभावली, तर मानसी पवार हिने कॅमेरा हाताळला. दोघींनी मिळून तयार केलेल्या या छोट्याशा व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. रस्त्यावर कुठे खड्डे आहेत, त्यातून वाहन चालवताना काय अडचणी येतात आणि पावसाळ्यात परिस्थिती किती खराब होते, हे मुलींनी आपल्या पद्धतीने दाखवले. केवळ रस्त्याचे चित्रण न करता त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. एखादा पत्रकार घटनास्थळी जाऊन परिस्थिती जाणून घेतो, त्याप्रमाणे मुलींनी एकमेकींशी प्रश्नोत्तर करत हा विषय मांडला. Viral Video:
त्यांच्या बोलण्यात मोठमोठे शब्द नव्हते. कोणतेही भाषण नव्हते. मात्र, रोजच्या अनुभवातून आलेली साधी भाषा आणि दिसणारी वस्तुस्थिती यामुळे हा व्हिडीओ अधिक परिणामकारक ठरला. रस्ता खराब असल्याने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना प्रवास करताना त्रास होतो, हे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जत-कोंदिवडे मार्गावर दररोज अनेक नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे या रस्त्याची अवस्था सुधारण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने केली जात असल्याचे सांगितले जाते. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी भरते आणि काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे सहज लक्षात येत नाहीत. अशा वेळी दुचाकीस्वारांसाठी धोका आणखी वाढतो. छोटासा निष्काळजीपणा मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो.
View this post on Instagram
या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलींनी केलेली ‘रिपोर्टिंग’ अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली आहे. समस्या मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ किंवा मोठी यंत्रणा आवश्यक नसते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. हातात असलेल्या छत्रीला माईक बनवून आणि मोबाईलच्या कॅमेऱ्याने त्यांनी आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवला. व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर या मुलींच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रश्नामागची खरी समस्या देखील चर्चेत आली आहे. शिक्षण घेत असतानाच आपल्या परिसरात काय घडत आहे, याची जाणीव या विद्यार्थिनींना आहे, हे त्यांच्या उपक्रमातून दिसून आले.
आता मुलींनी केलेल्या या अनोख्या प्रयत्नानंतर तरी संबंधित विभागाचे लक्ष या रस्त्याकडे जाणार का, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होणे ही एक बाजू आहे; मात्र त्यातून प्रत्यक्ष रस्त्याची दुरुस्ती झाली तरच या चिमुकल्या पत्रकारांच्या प्रयत्नांना खरा अर्थ मिळेल. खड्ड्यांकडे पाहून पुढे जाण्याऐवजी त्याच खड्ड्यांचा विषय बनवून तो प्रशासनासमोर मांडणाऱ्या या मुलींनी एक वेगळाच संदेश दिला आहे. मोठ्यांनी दुर्लक्ष केलेल्या प्रश्नावर चिमुकल्यांनी आवाज उठवला आहे. आता त्या आवाजाकडे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने पाहतात, याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.






