11 days of trump tenure 1,700 Indian illegal immigrants have been arrested
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध प्रवाशांविरोधात कठोर भूमिका घेतली असून त्याचा परिणाम लगेचच दिसू लागला आहे. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आणि सत्तेच्या केवळ 11 दिवसांतच 25,000 हून अधिक अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम इंफोर्समेंट (ICE) टीमने 12 राज्यांमध्ये छापे टाकले आहेत.
यामध्ये सुमारे 1700 भारतीय अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच 18,000 भारतीयांना डिपोर्ट करण्यासाठी निवडले गेले होते. ट्रम्प यांच्या कठोर धोरणांमुळे भारतासह इतर अनेक देशांच्या अवैध प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली आहेत. एकीकडे कॅनडा, मेक्सिको आणि चीनसोबत टॅरिफ वॉर सुरु असताना दुसरीकडे बेकायदेशीर स्थलांतरितांच्या निर्णयावरही कारवाई सुरुच आहे.
मेक्सिकोतून घुसखोरीच्या घटनांमध्ये मोठी घट
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर प्रशासनाने कठोर सीमा नियंत्रण धोरण स्वीकारले आहे. यामुळे मेक्सिको सीमेमार्गे घुसखोरीच्या घटनांमध्ये 94% घट झाली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सत्तेच्या कालावधीत 1 जानेवारी ते 19 जानेवारीदरम्यान दररोज सरासरी 2087 घुसखोरीच्या घटना घडत होत्या, मात्र, ट्रम्प यांच्या सत्ता स्वीकारल्यानंतर हा आकडा केवळ 11 दिवसांत 126 पर्यंत खाली आला आहे.
कॉलेज-युनिव्हर्सिटीसाठी DEI सबसिडी रोखली
ट्रम्प प्रशासनाने विविधता, समानता आणि समावेश (DEI) धोरणांतर्गत दिली जाणारी 9,000 कोटी रुपयांची सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत महिला, ट्रान्सजेंडर, अपंग विद्यार्थी आणि इतर वंचित गटांना संशोधन व प्रकल्पांसाठी अनुदान दिले जात होते. DEI सबसिडी रोखल्यामुळे सुमारे 1 लाख भारतीय कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. अमेरिका सरकारच्या 32 लाख फेडरल कर्मचाऱ्यांपैकी 8 लाख कर्मचारी DEI अंतर्गत कार्यरत होते, यामध्ये अनेक भारतीय नागरिक आणि H-1B वर्क व्हिसावर काम करणारे कर्मचारी होते.
अवैध प्रवाशांमध्ये भारतीय चौथ्या क्रमांकावर
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत मेक्सिकोमधून सर्वाधिक 9,296 अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर हैतीचे 7,600, निकाराग्वाचे 4,800 आणि भारतीय 1,700 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. सध्या अमेरिकेत 1 कोटी 10 लाख अवैध प्रवासी आहेत, त्यापैकी 40 लाख मेक्सिकोचे, तर 7.25 लाख भारतीय आहेत.
ट्रम्प यांनी देशातील नागरिकांसाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील संधी वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अमेरिकेची एकूण 35 कोटी लोकसंख्या आहे, त्यापैकी 20 कोटी गोरे नागरिक आहेत. ट्रम्प यांच्या कठोर धोरणांमुळे भविष्यात अवैध प्रवाशांसाठी आणखी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.