200 UK companies sign up to 4-day workweek scheme.
लंडन: एकीकडे जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच-सहा दिवस काम करावे लागते. तसेच भारतात सध्या 90 तास काम करणे किंवा रविवारही काम करण्याबाबत चर्चा सुरु असताना एका देशाने कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी आठवड्यातून 4 दिवस काम आणि तीन दिवस सुट्ट्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील काही कंपन्यांनी वर्किंग डेजचा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याुमळे ब्रिटनच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
भारतात कामाचे 90 तास
L&T कंपनीचे चेअरमन एस. एन. सुब्रह्मण्यम यांनी दिलेल्या विधानामुळे भारतात 90 तास काम करण्याच्या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी म्हटले होते की, “मला खेद वाटतो की मी माझ्या कर्मचाऱ्यांकडून रविवारी काम करून घेऊ शकत नाही.” त्यांच्या म्हणण्यानुसार भारतातील कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम केले पाहिजे आणि आठवड्यात 90 तास काम करण्याची सवय लावली पाहिजे. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशात खळबळ उडाली होती. अनेकांनी याला विरोध देखील केला. सुब्रह्मण्यम यांच्यांवर अनेक टिकाही करण्यात आल्या.
ब्रिटनमध्ये चार दिवस वर्किंग
मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये भारताच्या उलट आहे. 200 हून अधिक कंपन्यांनी आठवड्यात फक्त चार दिवस काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणामुळे कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची सुट्टी मिळत आहे. तसेच त्यांच्या पगारात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. या कंपन्यांमध्ये सुमारे 5,000 कर्मचारी कार्यरत असून प्रामुख्याने मार्केटिंग, टेक्नोलॉजी, आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतात. चार दिवसांच्या वर्किंग वीकमुळे कर्मचाऱ्यांना जास्त मोकळा वेळ मिळत आहे. यामुळे त्यांच्या कामाचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारत असल्याचे दिसून आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
4 दिवसांच्या वर्किंग वीकचे फायदे
अहवालानुसार, चार दिवसांचा वर्किंग वीक करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, पाच दिवस काम करणे ही जुन्या काळातील पद्धत आहे. फाउंडेशन कॅम्पेनचे डायरेक्टर जोई राइल यांच्या म्हणण्यानुसार, “आठवड्यात चार दिवस काम केल्याने कर्मचाऱ्यांना 50% अधिक मोकळा वेळ मिळतो. यामुळे ते अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगतात.” तसचे, कमी कामाचे दिवस हे केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर कंपन्यांसाठीही फायदेशीर ठरू शकतात. कमी कामाचे तास असूनही कामाची उत्पादकता वाढू शकते आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्यही सुधारित राहिल.
चार दिवसांच्या वर्किंग वीकची सुरुवात मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग कंपन्यांनी केली आहे. यानंतर सामाजिक क्षेत्रातील संस्था, टेक्नोलॉजी फर्म्स, आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील कंपन्यांनीही हा बदल स्वीकारला आहे. जिथे भारतात जास्त तास काम करण्यावर भर दिला जात आहे, तिथे ब्रिटनने कमी तास काम करून अधिक गुणवत्ता आणि तणावरहित जीवनशैलीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.