America Spying India:
भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीच्या पल्ल्यामुळे केवळ चीन आणि पाकिस्तानच नाही तर अमेरिकेलाही धक्का बसला आहे. चीनपाठोपाठ आता अमेरिकेनेही आपले “ओशन टायटन” हे गुप्तचर जहाज हिंद महासागरात पाठवल्याची माहिती समोर आली आहे. येत्या १५ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत भारताकडून बंगालच्या उपसागरात ३,५५० किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी करणार आहे.त्या पार्श्वभूमीवर चीन आणि अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
ओशन टायटनसह चीनचे ‘युआन वांग-५’ हे पाळत ठेवणारे जहाजही मलाक्का सामुद्रधुनी ओलांडून लवकरच हिंद महासागरात दाखल होणार आहे. भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही जहाजांचे हिंद महासागरात दाखल होणार असल्याचे माहिती आहे. यापूर्वी भारतीय क्षेपणास्त्र चाचण्यांच्या काळात हिंद महासागरात चिनी ‘युआन वांग’ वर्गातील जहाजे दिसली होती. मात्र, भारतीय क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान या प्रदेशात अमेरिकेचे संशोधन जहाज दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर भारत आणि अमेरिकेतील संबंधही ताणले गेले आहेत. त्यामुळे चीनप्रमाणेच आता अमेरिकेनेही भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची जहाज हिंद महासागरात दाखल होणार आहेत. त्यामुळे अमेरिका आता भारताची हेरगिरी करत आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ऑपरेशन सिंदूरपासून, ट्रम्प सरकार आणि पाकिस्तानची जवळीकताही वाढली आहे.
एका वृत्तानुसार अमेरिकेचे ओशन टायटन हे नुकतेच मालदीवमध्ये दिसले आहे. चिनी संशोधन जहाजे देखील मालदीवमधून भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर लक्ष ठेवून आहेत.
६ ऑक्टोबर रोजी भारताने या क्षेपणास्त्र चाचणीबाबत एक नोटाम (हवाई दलाला सूचना) जारी केली. सुरुवातीला या चाचणीसाठी नो-फ्लाय झोन रेंज १,४८० किलोमीटर निश्चित करण्यात आली होती, परंतु दुसऱ्या दिवशी त्याची रेंज २,५२० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर, अवघ्या २२ तासांत, त्याची रेंज आणखी ३,५५० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली. यामुळे क्षेपणास्त्राच्या वापराबद्दल नवनव्या गोष्टी समोर येत आहेत.
२५ सप्टेंबर रोजी, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) यांनी २००० किलोमीटरच्या श्रेणीतील अग्नि-प्राइमची चाचणी केली होती. त्यामुळे, १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान होणारी चाचणी अग्नि-मालिका क्षेपणास्त्राची देखील असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भारताच्या शस्त्रागारात मोठ्या पल्ल्याची अनेक अग्नि क्षेपणास्त्रे आहेत. त्यापैकी सर्वात लांब पल्ल्याचे म्हणजे ५,००० किमीची क्षमता असणारेही क्षेपणास्त्रही आहे. अग्नि-५ क्षेपणास्त्रामध्ये जवळजवळ संपूर्ण आशिया व्यापलेला आहे. यात पाकिस्तान आणि चीनच्या उत्तरेकडील भागांसह तसेच युरोपच्या काही भागांचा समावेश आहे. देशाच्या दीर्घकालीन सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे क्षेपणास्त्र विकसीत करण्यात आले आहे. अग्नि-५ क्षेपणास्त्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे MIRV तंत्रज्ञान. MIRV म्हणजे मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्राला अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्याची परवानगी मिळते, ज्यामुळे ते अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते.