Bangladesh political crisis : बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या राजवटीच्या समाप्तीनंतर आलेल्या युनूस सरकारला दिवसेंदिवस वाढत्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. देशांतर्गत अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांची भूमिका केंद्रस्थानी येऊ लागली आहे. त्यांच्या अलीकडील विधानांमुळे हे स्पष्ट संकेत मिळत आहेत की, बांगलादेशही पाकिस्तानसारख्या लष्करी हस्तक्षेपाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
पाकिस्तानच्या छायेत बांगलादेश?
राजकीय विश्लेषकांच्या मते, युनूस सरकारने सत्तेवर येताच पाकिस्तानशी वाढती जवळीक साधली असून, भारतविरोधी धोरणे राबवण्यास प्रारंभ केला आहे. शेख हसीना यांच्या काळात भारताशी मैत्रीपूर्ण संबंध टिकवले गेले होते, परंतु सत्तांतरानंतर देशाचे परराष्ट्र धोरण झपाट्याने बदलले आहे. युनूस सरकारचा पाकिस्तानकडे झुकणारा कल आणि लष्कराच्या निर्णय प्रक्रियेत वाढती भूमिका हे दोन्ही घटक देशातील लोकशाहीसाठी धोका ठरत आहेत. जनरल वकार-उझ-जमान हे पाकिस्तानच्या लष्करी धोरणाने प्रेरित असून, त्यांनी घेतलेल्या अलीकडील निर्णयांनी आणि भाषणांनी त्यांचा सत्तेत अधिक सक्रीय हस्तक्षेप करण्याचा उद्देश उघड केला आहे.
हे देखील वाचा : International Biological Diversity Day: ‘हा’ खास दिवस निसर्गाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या स्पष्ट करतो, जाणून घ्या इतिहास
सरकारवरील रोष, लष्कराची वाटचाल सत्तेकडे
बांगलादेशमध्ये सत्तांतरानंतर दहा महिने उलटून गेले तरीही सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत, यामुळे जनतेमध्ये असंतोष वाढत आहे. हेच असंतोषाचे वातावरण लष्करासाठी संधी ठरू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. जनरल वकार-उझ-जमान यांनी नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय लष्करी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, या वर्षी डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्यांनी लष्कर अधिकाऱ्यांना उद्देशून दिलेल्या भाषणात म्हटले, “बांगलादेशला राजकीय स्थिरतेची अत्यंत गरज आहे आणि ती केवळ निवडून आलेल्या सरकारद्वारेच शक्य आहे, निवडून न आलेल्या निर्णयकर्त्यांद्वारे नाही.” हे वक्तव्य थेट युनूस सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
नागरी प्रशासनात सैन्याचा वापर, एक धोक्याची घंटा
युनूस सरकारने पोलिसांऐवजी अनेक नागरी प्रशासनिक कामांमध्ये लष्कराची तैनाती केली आहे, जे लष्करप्रमुखांना मान्य नसल्याचे दिसते. या निर्णयामुळे लष्कराची मूळ संरक्षणक्षमता कमी होऊ शकते, अशी स्पष्ट टीका त्यांनी बैठकीत मांडली. युनूस सरकारने लष्कराचा वापर केवळ सत्तेवर आपले नियंत्रण मजबूत ठेवण्यासाठी केला असल्याचा आरोप होऊ लागला आहे. लष्कराच्या असंतोषाचा उपयोग जनरल वकार सत्तेच्या दिशेने करणार का?, असा सवाल आता आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
हे देखील वाचा : Jayant Narlikar Passed Away: ‘एक युग संपले, पण प्रेरणा अजरामर…’ वाचा कसा होता पद्मविभूषण जयंत नारळीकर यांचा जीवनप्रवास
लोकशाही की लष्करशाही? बांगलादेश मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर
शेजारील पाकिस्तानमध्ये, स्वातंत्र्यानंतर एकाही पंतप्रधानाने आपला कार्यकाल पूर्ण केला नाही. तिथे लष्कराने वेळोवेळी सत्तेवर ताबा मिळवला आहे. आता बांगलादेशही त्याच मार्गावर चालत असल्याचे संकेत मिळत आहेत. युनूस सरकारची पकड सैल होताना दिसत आहे, आणि जनरल वकार-उझ-जमान यांची लष्करातील लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. भारतविरोधी भूमिकेच्या बदल्यात पाकिस्तानचा पाठिंबा मिळवणाऱ्या युनूस सरकारला लष्कराच्या स्वप्नांची किंमत चुकवावी लागणार का? हा प्रश्न सध्या संपूर्ण बांगलादेशात चर्चेचा विषय बनला आहे.
बांगलादेशची पाकिस्तानपेक्षा वाईट स्थिती
बांगलादेशच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ होण्याचे संकेत स्पष्ट आहेत. युनूस सरकारच्या कार्यशैलीवर रोष, निवडणुकीचा अभाव, आणि लष्करप्रमुखांची स्वायत्त विधानं हे सगळं पाहता बांगलादेश पाकिस्तानपेक्षा वाईट स्थितीकडे झुकत असल्याचा धोक्याचा इशारा मानला जातो. येत्या काही महिन्यांत देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत निर्णायक काळ ठरणार आहे.