Jayant Narlikar Passed Away : भारतातील अग्रगण्य खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानसंचार क्षेत्रातील दीपस्तंभ, डॉ. जयंत विष्णु नारळीकर यांचे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कंबरेची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.
खगोलशास्त्राच्या आकाशातला तेजस्वी तारा हरपला
डॉ. नारळीकर हे केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात. त्यांचे खगोलभौतिकशास्त्रातील संशोधन, विशेषतः “Steady State Theory” संदर्भातील कार्य, जागतिक पातळीवर महत्त्वाचे मानले गेले. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये खगोलशास्त्र विभागाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. १९८८ साली, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते. निवृत्त होईपर्यंत त्यांनी आयुका या संस्थेच्या विकासासाठी कार्य केले.
हे देखील वाचा : Jayant Narlikar passes away : मोठी बातमी! ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
शास्त्र आणि साहित्याचा अनोखा संगम
डॉ. नारळीकर यांचा खरा लौकिक केवळ वैज्ञानिक म्हणून नव्हे, तर विज्ञान सादरकर्ते आणि लेखक म्हणूनही होता. त्यांनी कथा, लेख, टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रम यांच्या माध्यमातून विज्ञानातील गुंतागुंतीची तत्त्वे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली. विज्ञान म्हणजे कोरडे गणित नाही, तर जीवनाचा भाग आहे हे ते कथांद्वारे समजावून सांगायचे. त्यांच्या विज्ञान लोकप्रियतेच्या कार्यामुळे १९९६ मध्ये युनेस्कोने त्यांना कलिंग पुरस्कार देऊन गौरविले. त्यांनी लिहिलेली पुस्तके मराठीतून आणि इंग्रजीतून प्रसिद्ध झाली असून, ती आजही विद्यार्थ्यांमध्ये आणि सामान्य वाचकांमध्ये तितकीच लोकप्रिय आहेत.
सन्मान आणि पुरस्कारांची शृंखला
डॉ. नारळीकर यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. २००४ साली भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले. याशिवाय, २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला. त्यांचे शिक्षणही तितकेच प्रेरणादायी होते. त्यांनी बीएचयूमधून सुरुवातीचे शिक्षण घेतले, आणि नंतर केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. केंब्रिजमधील प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्यासोबत त्यांनी संयुक्त संशोधन केले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशात राजकीय संघर्ष टोकाला; कोणत्याही परिस्थिती शेख हसिनांना सोडण्यास तयार नाही सरकार, अडचणीत वाढ
एक युग संपले, पण प्रेरणा अजरामर
डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन म्हणजे भारतीय विज्ञान आणि समाजासाठी मोठी पोकळी निर्माण करणारा क्षण आहे. त्यांनी विज्ञानाचा प्रचार केवळ प्रयोगशाळांमध्ये न करता, सामान्य माणसाच्या घरापर्यंत नेला. सोप्या भाषेत अवघड गोष्टी समजावून सांगणारा आवाज आज हरपला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल, आणि त्यांच्या विज्ञानप्रियतेचा वारसा अनेक वर्षे जिवंत राहील.
डॉ. नारळीकर यांच्या आठवणींना विज्ञानप्रेमींचा मानाचा मुजरा.