'देश सोडण्यााचा कोणताही हेतू नव्हता'; बशर अल-असद यांनी सत्तापालटानंतर सोडले मौन
दमास्कस: सीरियामध्ये सत्तापालट झाल्यानंतर बशर अल-असद यांनी अखेर आपले मौन सोडले. सध्या त्यांचे एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, त्यांचा सीरिया सोडण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांनी दमास्कस सोडण्याला एक आवश्यक रणनीतिक पाऊल म्हणून संबोधले आहे. असद यांनी सांगितले की त्यांच्या मनात कधीही पद सोडण्याचा किंवा शरण घेण्याचा विचार नव्हता. त्यांच्या मते, त्यांचा एकमेव पर्याय म्हणजे आतंकवादी हल्ल्यांविरोधात लढाई सुरू ठेवणे.
बिकट परिस्थितीमुळे देश सोडण्याचा निर्णय घेतला
राजधानीवर हयात तहरीर अल-शाम (HTS) आणि त्यांच्या सहकारी गटांनी कब्जा केला होता. बशर अल-असद यांनी सांगितले की विद्रोह्यांनी दमास्कसवर हल्ला केल्यानंतर, 8 डिसेंबर रोजी त्यांनी राजधानी सोडली. त्यानंतर पश्चिम सीरिया स्थित रशिया सैन्य तळावरही परिस्थिती बिघडू लागली आणि ड्रोन हल्ल्यांनी सैन्य तळावर संकट आणले. या परिस्थितीत, 8 डिसेंबरच्या रात्री रशियाने असद यांना सुरक्षितपणे मॉस्कोला हलवण्याचा निर्णय घेतला. असद यांनी हे स्पष्ट केले की त्यांच्या सीरिया सोडण्याचा निर्णय अचानक घेतला गेला नाही, तर ती त्या काळातील बिकट परिस्थितीमुळे घडलेली एक गरज होती.
मी देशवासीयांना धोका दिलेला नाही- बशर अल-असद
असद यांनी आपल्या निवेदनात असेही नमूद केले की त्यांनी कधीही सीरिया किंवा सीरियन लोकांना सोडून जाण्याचा विचार केला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मी कधीही पद सोडण्याचा किंवा शरण जाण्याचा विचार केला नाही. माझे कार्य एकट्या आतंकवादी हल्ल्यांविरोधात संघर्ष सुरू ठेवणे हे होते.” बशर अल-असद यांनी असेही स्पष्ट केले की ज्यांनी लेबनान व पॅलेस्टाईन प्रतिकाराला पाठिंबा दिला आहे, त्यांनी कधीही आपल्या सहकाऱ्यांना किंवा देशवासीयांना धोका दिला नाही. त्यामुळे ते सीरिया किंवा आपल्या सैन्याला धोका देणारे व्यक्ती नसून त्यांनी परिस्थितीचा सामना करण्याचा निश्चय केला होता.
दरम्यान, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे की, बशर अल-असद यांनी शांततेत सत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असून देश सोडला आहे. क्रेमलिनच्या सूत्रांनीही असे स्पष्ट केले की असद आणि त्यांचे कुटुंब आता मॉस्कोमध्ये सुरक्षित आहेत.
सीरियीची सत्ता HTS च्या नियंत्रणाखाली
सध्या सीरियाची सत्ता एचटीएसच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु पूर्णतः हस्तांतरित झालेली नाही. राष्ट्राध्यक्ष असद यांच्या पळून गेल्यानंतर पंतप्रधान मोहम्मद गाझी अल-जलाली यांनी शांततेने सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन दिले आहे. अल-जोलानी यांनीदेखील आपल्या सैन्याला सार्वजनिक स्थानांवरून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. नव्या सरकारची अधिकृत रचना पूर्ण होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता आहे.