फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: नाताळपूर्वी अमेरिकेत एक मोठी दूर्घटना घडली आहे. अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील एका ख्रिश्चन शाळेत क्रिसमसच्या गोळीबार करण्यात आला. लहान मुले आणि शिक्षकांवर अचानक हल्ला झाला. मीडिया रिपोर्टनुसार, एका मुलीने अचानक शाळेत ताबडतोड गोळीबार केला, या गोळीबारात पाच लोकांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा धक्कादायक प्रकार शाळेच्या परिसरात घडल्याने विद्यार्थ्यांसह संपूर्ण व्यवस्थापनाला हादरा बसला आहे.
17 वर्षीय मुलीने हल्ला केला
एसोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या मुलीचे वय 17 असून, या गोळीबारात शाळेतील काही विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संबंधित मुलीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचे त्यांनी सांगतिले. तसेच पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, घटनास्थळी पोहोचण्याआधी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
घटनास्थळी बंदोबस्त
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीने 9mm पिस्तूलचा वापर केला. अद्याप हल्ल्याच्या हेतूबद्दल काही स्पष्ट झालेले नाही, मात्र सध्या पोलिस या घटनाचा तपास करत आहेत आणि आरोपीच्या कुटुंबाने तपासात सहकार्य केले आहे. या घटनेनंतर शाळेच्या आसपासचे रस्ते बंद करण्यात आले असून, फेडरल एजंट्ससुद्धा स्थानिक पोलिसांना मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
322 पेक्षा जास्त गोळीबाराच्या घटना
सध्या याघटनेमुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील गन कल्चरवर नियंत्रण मिळवणे हे देशासमोरील एक मोठे आव्हान बनले आहे. K-12 स्कूल शूटिंग डेटाबेसच्या अहवालानुसार, यंदा अमेरिकेतील शाळांमध्ये 322 पेक्षा जास्त गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. शाळा सुरक्षित ठिकाण असावे, असा समाजाचा विश्वास असतो, परंतु या प्रकारांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण होत आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी पोलिस तपास सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये मेटल डिटेक्टरसारख्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. ही घटना पुन्हा एकदा अमेरिकेतील शालेय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. गन कल्चरमुळे अमेरिकेत अशा घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कायदे अधिक कठोर करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण समाज हादरला असून, या घटनेने शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या पुनर्विचाराची गरज निर्माण केली आहे.