
October Heat : ऑस्ट्रेलियात पुन्हा 'वणवा' पेटणार? वाढते तापमान पाहता प्रशासन हाय अलर्टवर
मागील काही दशकात ऑस्ट्रेलियात खासकरून ‘ऑक्टोबर हिट‘च्या (October Heat) काळात जंगलात वणवा पेटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना एवढ्या भीषण होत्या की, त्याची झळ त्याच्या आसपासच्या शहरांनाही बसली होती. त्याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील प्रशासनाने राजधानी सिडनी व तिच्या जवळपासच्या परिसरात वाढत्या तापमानासाठी हाय अलर्ट जारी केले आहे.
येथील हवामान खात्याने सोमवारी सिडनीच्या पश्चिम भागातील तापमान 37 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली होती. गरमी आणि दमट हवामानामुळे येथील जंगलातील वणवा पेटण्याचा धोका आणखीन वाढला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्यातील ग्रामीण अग्निशमन विभागाने ग्रेटर सिडनी आणि ग्रेटर हंटर क्षेत्रात पूर्णतः आग प्रतिबंधक उपाय लागू केले आहेत. या काळात मोकळ्या जागेत आग लावणे, काही विशिष्ट इंधनाने चालवण्यात येणारे बारबेक्यू आणि ग्राइंडिंग तसेच वेल्डिंगसारख्या गतीविधींवर बंदी आणली आहे.
हवामान विभागाच्या मते, सोमवारचा दिवस मागील अनेक महिन्यांमधील अत्यंत उष्ण दिवस असू शकतो. जर तापमान 37 डिग्रीपर्यंत पोहचते, तर हे ऑक्टोबरच्या सरासरी तापमानापेक्षा 10 ते 11 डिग्री अधिक होऊ शकते. सिडनीमध्ये या अगोदर फेब्रुवारीत यापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली होती.
हवामान विभागाच्या मते, न्यूकॅसलच्या उत्तरेपासून वोलाँगाँगपर्यंतच्या परिसरातील तापमान 34 ते 36 डिग्रीच्या मध्ये राहण्याचा अंदाज आहे. दुपारच्या काळात यात बदल होत, येथे वेगाने दमट वारे वाहू शकतात.
न्यू साउथ वेल्स ग्रामीण अग्निशमन सेवाचे आयुक्त ट्रँट कर्टिन यांनी इशारा दिला आहे की, राज्यातील अनेक परिसरात जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळे येण्याची शक्यता आहे; मात्र, त्यामुळे पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. उलट येथे अतीउष्ण किंवा अती दमट वारे वाहतील.
अशा परिस्थितीत ‘ड्राय लाइटनिंग’ (कोरडी वीज) पडल्यामुळे आग लागण्याचा धोका कायम आहे. म्हणजेच, विजांचा कडकडाट होऊन वीज पडू शकते; मात्र पाऊस पुरेसा न पडल्याने जंगलात किंवा कोरड्या भागात आग लागण्याची शक्यता असते.
कोरडी वीज अशा स्थितीला म्हटले जाते, जेव्हा गडगडणाऱ्या ढगांतून जमिनीवर वीज कोसळते, मात्र तेव्हा पडणारा पाऊस हा जमिनीपर्यंत पोहचत नाही आणि जर पोहचलाच तर तो आग विझवण्यासाठी काहीच कामाचा नसतो. अशा परिस्थितीत वीज कोसळून जंगल अथवा गवताळ प्रदेशात वेगाने आग भडकते.
कर्टिन यांनी नागरिकांना मोकळ्या मैदानात आग अथवा ज्वलनशील पदार्थ न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, अनुकूल परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षी अग्निशमन विभाग जंगलातील आगीचा धोका कमी करण्यासाठी अगोदरच्या वर्षांच्या तुलनेत सुसज्ज अशा अग्निशमन तंत्राने परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
या काळात ऑस्ट्रेलियाचे संघीय आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री क्रिस्टी मॅकबेन यांनी आपत्कालीन इशारा प्रणालीचा विस्तार करण्यावर भर दिला. या प्रणालीअंतर्गत आपात्कालिन स्थितीत प्रभावित क्षेत्राच्या जवळपास उपलब्ध मोबाइल फोनवर अलार्म वाजतो व संदेशही जातो.
अहवालानुसार सध्या विक्टोरिया आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाने ही प्रणाली उपयोगास सुरुवात केली आहे. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागात अती उष्ण वारे वाहिले. त्यामुळे तेव्हापासूनच तेथील प्रशासन ऑक्टोबर हिटच्या दृष्टीकोनातून अलर्ट मोडवर आले होते.