Bangladesh-India Relations: बांगलादेशात ढाका ते त्रिपुरा लॉंग मार्च; भारताची चिंता वाढली, सीमेवर अतिरिक्त सुरक्षादल तैनात
ढाका: बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ने आज भारताच्या त्रिपुरा सीमेपर्यंत “त्रिपुरा चली अभियान” नावाने लॉंग मार्च सुरू केला आहे. ढाक्याच्या नयापल्टन परिसरातून आज सकाळी( 9 वाजता) या आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारताने सीमेवरील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तसेच पश्चिम त्रिपुरा जिल्ह्याचे एसपी किरण कुमार यांना सीमावर्तीत भागांना आज सकाळी भेट दिली.
त्यांनी सांगितले की, बांगलादेशी आंदोलकांना झिरो पॉइंटच्या आधी रोखण्यात येईल. तसेच भारतीय सुरक्षा दल सतर्क असून सीमेवर अतिरिक्त सुरक्षादल तैनात करण्यात आले आहे. तसेच दुसरीकडे भारत आणि बांगलादेशने आपले मतभेद शांततेने सोडवण्याची मागणी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले आहे की, भारत आणि बांगलादेशने आपापसातील वाद शांततेने चर्चेने सोडवावा अशी आमची इच्छा आहे.
BNP चे वक्तव्य
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या लॉन्ग मार्चदरम्यान BNP चे नेते रूहुल कबीर रिजवी यांनी भारताविरोधी वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, “आम्ही रक्त सांडून स्वातंत्र्य मिळवले आहे. आता ते टिकवण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल.” त्यांनी भारतावर आरोप केला की, “भारताला भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका या देशांमध्ये हस्तक्षेप करायला आवडते. आम्हाला दिल्लीच्या अटी मान्य कराव्या लागतात, जे अस्वीकारार्ह आहे.”
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
डिप्टी हाई कमीशनविरोधात आंदोलन
BNP आणि त्याच्या सहयोगी पक्षांनी एकत्र येऊन हा लॉन्ग मार्च आयोजित केला आहे. या आंदोलनामागे बांगलादेशी डिप्टी हाई कमीशनवर झालेल्या हल्ल्याचा निषेध, राष्ट्रीय ध्वजाचा अपमान आणि सांप्रदायिक दंगे घडवण्याचा आरोप आहे. याआधी ढाक्यात भारतीय उच्चायुक्तालयासमोरही अशाच प्रकारे लॉन्ग मार्च करण्यात आले होते, परंतु तेव्हा पोलीस हस्तक्षेपामुळे आंदोलन अर्ध्यावर थांबवण्यात आले.
बांगलादेश दौऱ्यात भारताच्या चिंता व्यक्त
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी नुकताच बांगलादेशचा दौरा केला आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत भारताच्या चिंतेचा पुनरुच्चार केला. ढाक्यातील संवादादरम्यान मिसरी यांनी स्पष्ट केले की, “बांग्लादेशातील अंतरिम सरकारसोबत सहकार्याची भारताची इच्छा आहे.” त्यांनी अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आणि त्यावर चर्चा केली.
याशिवाय पाकिस्तान तज्ञ साजिद तरार यांनी दावा केला आहे की, बांगलादेश भारताविरुद्ध षड्यंत्र रचत आहे. त्यांनी भारताला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताच्या दोन्ही सिमेवर अल-जिहादच्या घोषणा दिल्या जात आहेत. यामुळे सध्या भारत आणि बांगलादेशमधील तणाव जगभरात चर्चेचा विषय बनला आहे.