फोटो सौजन्य: सोशल मीडिया
तेल अवीव: इस्त्रायलच्या पंतप्रधान नेतन्याहूंनी सीरियातील नव्या सरकारवर मोठे वक्तव्य केले आहे. नेतन्याहूंनी त्यांनी स्पष्ट केले की, जर नवीन सरकारने जुन्या सरकारसारख्या चुकांची पुनरावृत्ती केली, तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. नेतन्याहूंनी धमकी दिली आहे की, जर नवीन सरकारने इराणला हस्तक्षेप करण्याची मुभा दिली किंवा हिजबुल्लाहला शस्त्रपुरवठा सुरू ठेवला, तर इस्त्रायल शांत राहणार नाही आणि नवीन सरकार विरोधात आवश्यक ती पावले उचलेल.
सीरियाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही उद्देश नाही- नेतन्याहू
नेतन्याहू यांनी असेही म्हटले की, इस्त्रायलचा सीरियाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही उद्देश नाही. मात्र, देशाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे सर्व उपाय करण्याची तयारी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इस्त्रायलची हवाई सेना सीरियाच्या सोडलेल्या लष्करी तळांवर हल्ला करत आहे, जेणेकरून ते जिहाद्यांच्या ताब्यात जाऊ नयेत. नेतन्याहू यांनी ब्रिटिश हवाई सेनेच्या दुसऱ्या महायुद्धातील कृतीची उदाहरण म्हणून आठवण करून दिली. ब्रिटिशांनी विची फ्रान्सच्या तळांवर बमफेक केली होती, जेणेकरून ती शस्त्रे नाझींच्या ताब्यात जाऊ नयेत.
नेतन्याहूंनी मैत्रीची तयारी
बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, इस्त्रायल सीरियाच्या नव्या सरकारशी संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे, परंतु जर नव्या सरकारने इराणला पुन्हा सीरियामध्ये स्थापन होऊ दिले, हिजबुल्लाहला शस्त्रे पुरवली किंवा इस्त्रायलवर हल्ला केला, तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. मागील सरकारच्या चुकांमुळे काय झाले, हे नव्या सरकारने लक्षात ठेवावे, असा स्पष्ट इशार नेतन्याहूंनी सीरियाच्या नवीन सरकराला दिला.
नव्या संधीसह नवे धोकेही
रविवारी, सीरियामधील विद्रोह्यांनी दमास्कस ताब्यात घेतले आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद देश सोडून पळून गेले. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या असद यांच्या सत्तेचा अंत झाला. नेतन्याहू यांनी या घडामोडीचे स्वागत केले आणि त्याला मध्य पूर्वेसाठी एक ऐतिहासिक क्षण म्हटले. त्यांनी सांगितले की, असद यांच्या पतनामुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, पण मोठी आव्हानेही समोर आली आहेत.
यासंदर्भात त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, इस्त्रायल शांततेचा हात पुढे करतआहे. ड्रूझ, कुर्द, ख्रिश्चन आणि इतर मुस्लिमांना शांततेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, सीरियाच्या लष्कराने सोडलेल्या तळांवर शत्रूने कब्जा करू नये, यासाठी त्यांनी इस्त्रायली लष्कराला ही ठिकाणे नियंत्रणात घेण्याचे आदेश दिले आहेत.