फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंवर हल्ले सुर असून सध्या भारत-बांगलादेशातील संबंध बिघडत चालले आहेत. दरम्यान अमेरिकेने भारत आणि बांगलादेसातील वाढत्या तणावावर प्रतिक्रीया दिली आहे. अमेरिकेने दोन्ही देशांनी त्यांच्या मतभेदांचे शांततापूर्ण मार्गाने समाधान करण्याचे आवाहन केले आहे.
वॉश्गिंटनमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना अमेरेकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले की, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंधांमध्ये आलेल्या तणावाबाबत अमेरिका सतर्क आहे.भारताच्या परराष्ट्र सचिवांच्या अलीकडील बांगलादेश दौऱ्याचा संदर्भ देताना त्यांनी म्हटले की, “आम्ही दोन्ही बाजूंना शांततेने संवाद साधण्याचे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आवाहन करतो.”
बांगलादेश दौऱ्यात भारताच्या चिंता व्यक्त
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी नुकताच बांग्लादेशचा दौरा केला आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत भारताच्या चिंतेचा पुनरुच्चार केला. ढाक्यातील संवादादरम्यान मिसरी यांनी स्पष्ट केले की, “बांग्लादेशातील अंतरिम सरकारसोबत सहकार्याची भारताची इच्छा आहे.” त्यांनी अल्पसंख्याकांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आणि त्यावर चर्चा केली.
शेख हसीना यांचा मोहम्मद यूनुस यांच्यावर आरोप
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद यूनुस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेख हसीना यांनी म्हटले आहे की, यूनुस यांनी देशात अस्थिरता निर्माण केली असून, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध यांसारख्या अल्पसंख्याकांवर हल्ल्यांसाठी त्यांना जबाबदार धरले आहे. मोहम्मद युनूस विशेषत: हिंदूंवरील हत्याचारांमागे मास्टरमाईंड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, “युनुस यांच्या कारवायांमुळे बांगलादेशात धार्मिक स्थळांवर हल्ले आणि हिंसा वाढली आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
धार्मिक हिंसेचे आरोप
शेख हसीना यांनी आरोप केला की, 5ऑगस्टनंतर बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले आणि सामूहिक हत्यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यांनी याला सुनियोजित कट म्हणून वर्णन केले. हसीना यांनी असेही म्हटले की, नवीन सरकारने कट्टरपंथीय गटांना मोकळीक दिली आहे, यामुळे देशातील शांतता धोक्यात आली आहे.
याशिवाय पाकिस्तान तज्ञ साजिद तरार यांनी दावा केला आहे की, बांगलादेश भारताविरुद्ध षड्यंत्र रचत आहे. त्यांनी भारताला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने यावेळी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे कारण भारताच्या दोन्ही सिमेवर अल-जिहादच्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच मोहम्मद युनूस सरकारने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची ऑर्डर दिलेली आहे. त्यांनी उघडपणे सांगितले आहे की ही शस्त्रे भारतासाठी असण्याची शक्यता आहे.
यामुळे सध्या भारत आणि बांग्लादेशमधील तणाव जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. अमेरिकेने केलेल्या आवाहनामुळे या तणावावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.