bangladesh mosque temple dargah incidents comilla homan district
कुमिल्ला जिल्ह्यातील तीन सूफी दर्ग्यांना आग लावली गेली, एका व्यक्तीचा मृत्यू तर २२ जण जखमी.
फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टनंतर स्थानिक मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून घोषणा करून हिंसक जमाव एकत्र आला.
बांगलादेशात मंदिरांपासून ते सूफी दर्ग्यांपर्यंत धार्मिक स्थळांवर हल्ल्यांची मालिका वाढली असून प्रशासनाचे नियंत्रण अपयशी ठरत आहे.
Bangladesh mosque Attacks : बांगलादेशातील धार्मिक सौहार्द पुन्हा एकदा रक्तरंजित घटनांनी हादरले आहे. हिंदू मंदिरांवर हल्ल्यांची मालिका थांबते की नाही, याची चिंता असतानाच आता सूफी दर्ग्यांवरही हिंसक जमावाने तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. कुमिल्ला जिल्ह्यातील होमन उपजिल्ह्यात गुरुवारी झालेल्या या घटनांमध्ये तीन दर्गे जाळण्यात आले, एका निरपराध व्यक्तीचा मृत्यू झाला तर तब्बल २२ जण गंभीर जखमी झाले.
या साऱ्या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावरून झाली. कफीलुद्दीन शाह या सूफी संताच्या नातवाने मोहसीन याने इस्लाम व पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी फेसबुकवर लिहिल्याचा आरोप आहे. ही पोस्ट व्हायरल होताच स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली. पोलिसांनी मोहसीनला ताब्यात घेतलं, परंतु लोकांचा राग शांत झाला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India US Trade Deal : भारतीय उद्योगांसाठी सुवर्णकाळ येणार? मुख्य आर्थिक सल्लागारांचा ‘Trump Tariff’ वर धाडसी दावा
पोलिसांनी मोहसीनवर कारवाई केली, आश्वासनही दिले; मात्र तणाव वाढतच गेला. काही तासांतच एका मशिदीतून लाऊडस्पीकरवरून घोषणा करण्यात आली आणि क्षणार्धात मोठा जमाव रस्त्यावर उतरला. संतप्त लोकांनी थेट मोहसीनच्या घरावर धाव घेतली, पण नंतर हा राग दर्ग्यांवर वळला. भावनांचा उद्रेक एवढा तीव्र होता की कफीलुद्दीन शाह, हवेली शाह आणि अब्दु शाह या तीन आदरणीय सूफी संतांच्या दर्ग्यांना आग लावण्यात आली.
या दर्ग्यांचे महत्त्व साधे नव्हते. कफीलुद्दीन शाह, हवेली शाह आणि अब्दु शाह हे संत आपल्या काळात इस्लाममध्ये सुधारणा व वेगळा आध्यात्मिक प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या निधनानंतर बांधले गेलेले दर्गे हे केवळ प्रार्थनेची ठिकाणे नव्हती, तर समाजातील हजारो लोकांसाठी श्रद्धास्थाने बनली होती. विशेषतः शाह घराण्याशी नाते सांगणारे अनुयायी आजही मोठ्या प्रमाणावर या दर्ग्यांना भेट देतात. त्यामुळे या दर्ग्यांवरील हल्ला हा केवळ धार्मिक स्थळांवरील आक्रमण नाही, तर लोकांच्या श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशावरचा थेट प्रहार आहे.
अचानक पेटलेल्या हिंसेमुळे परिसरात भीतीचं सावट पसरलं. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. काही तासांच्या संघर्षानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र त्याआधी तीनही दर्गे जळून खाक झाले होते. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, हिंसेत सामील लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
धार्मिक असहिष्णुता ही बांगलादेशासाठी नवी गोष्ट नाही. यूके सरकारच्या अहवालानुसार, ऑगस्ट २०२४ ते डिसेंबर २०२४ या चार महिन्यांत तब्बल १३३ प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले. यामध्ये सर्वाधिक हल्ले हिंदू मंदिरांवर झाले असून, त्यानंतर सूफी दर्ग्याही मोठ्या प्रमाणावर लक्ष्य ठरल्या आहेत. शेकडो तीर्थस्थळांची विटंबना झाली आहे.
बांगलादेशात सध्या तात्पुरते प्रशासन सांभाळणारे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी सत्तेत आल्यानंतर धार्मिक सौहार्द टिकवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सतत वाढणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांनी त्यांचे दावे फोल ठरले आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि अल्पसंख्याक समुदायांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच वाढली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iron Beam Laser System : युद्धात क्रांती ठरणार इस्रायलचा आयर्न बीम; आयर्न डोम नंतर ‘हा’ नवा कवच तैनातीसाठी सज्ज
बांगलादेशातील या घटनांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे
धार्मिक श्रद्धा, सोशल मीडियावरील भडकावणारे संदेश आणि राजकीय निष्क्रियता यांचा संगम इतका घातक ठरतोय का?
असुरक्षिततेच्या या वातावरणात अल्पसंख्याक समुदाय कसे जगणार?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरकारकडे खरोखरच या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता आहे का?
या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात स्पष्ट होतील; पण आजच्या घडीला सत्य इतकेच आहे की मंदिरांनंतर आता दर्ग्यांवरही हल्ले होत असून, बांगलादेश धार्मिक द्वेषाच्या ज्वाळांमध्ये धगधगत आहे.